‘सामना’चे संपादक खा. संजय राऊत प्रमुख पाहुणे व स्वागताध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत
कर्जत येथे होणारा आदर्श तालुका जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा
मराठी पत्रकार परिषदेसाठी मैलाचा दगड ठरेल- एस.एम.देशमुख
अहमदनगर : दि.३
मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा कर्जत (जि. अहमदनगर) येथे येत्या ७ एप्रिलला होत आहे. या मेळाव्यासाठी खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे प्रमुख पाहुणे तर स्वागताध्यक्ष रोहित पवार हे आहेत. मेळाव्याची तयारी जोरदार सुरू असून मेळावा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सर्वच पत्रकार खूपच परिश्रम घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी देखील त्यांना आवश्यक तेथे मदत करीत आहेत. मात्र, हा मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी मराठी पत्रकार परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची आहे. त्यानुसार सर्वांनी निदान दररोज एक तास तरी मेळाव्याच्या तयारीसाठी द्यावा, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना केले असून तालुक्यांची ओळख सर्व महाराष्ट्रात व्हावी म्हणून आपण हा मेळावा आवर्जून ग्रामीण भागात घेत असतो. कर्जत मेळावा नक्कीच लक्षात राहणारा ठरेल असाच होईल व मराठी पत्रकार परिषदेसाठी हा मेळावा मैलाचा दगड ठरेल असा ठाम विश्वास एस.एम. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
कर्जत येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी रविवार (२ एप्रिल) रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. बैठकीला परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख, महिला आघाडीच्या राज्य संघटक शोभाईताई जयपूरकर, उपााध्यक्ष गो.पी.लांडगे, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, राज्य डिजिटल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, किशोर महाजन, विजयसिंह होलम, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, अहमदनगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, कर्जत मेळावा संयोजन समितीचे अध्यक्ष गणेश जेवरे आदींसह ३० पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना एस.एम.देशमुख म्हणाले, ‘अहमदनगर व कर्जत येथील मराठी पत्रकार परिषदेच्या टीमला कमी वेळ असतानाही पुरस्कार वितरण सोहळ्याचे यजमानपद त्यांनी स्वीकारले. त्यानंतर त्यांना अवघे दहा दिवस मिळून सुद्धा त्यांनी वेगाने तयारी केली आहे. जवळपास ९० टक्के तयारी पूर्ण झाली असल्याचे आजच्या आढवा बैठकीत दिसून येत आहे. उर्वरीत कामेही पुढील दोन दिवसात पूर्ण होतील, असा विश्वास आहे. या मेळाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकारांनी येणे गरजेचे आहे. ज्या तालुका व जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे, अशा प्रत्येक तालुक्यातून किमान २५ ते ३० जणांनी मेळाव्याला येणे अपेक्षित आहे. यासर्वांचा खासदार संजय राऊत व स्वागताध्यक्ष रोहित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. संजय राऊत सारख्या कार्यकारी संपादकाचे विचार ऐकण्याची यानिमित्ताने संधी मिळणार आहे. यासर्वांचा लाभ आपण घेण्याची गरज आहे.’
विश्वस्त किरण नाईक म्हणाले की, ‘कर्जतचे पत्रकार मित्र व अहमदनगर येथील मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी यांनी कार्य़क्रमाची जबाबदारी घेतली असली, तरी हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे शक्यतो आयोजकांना आपल्यामुळे जास्त त्रास होऊ नये, कौटुंबिक सोहळा समजून याची काळजी घ्यावी. कार्य़क्रमाची दिवशी सकाळी लवकर कर्जत पोहोचता येईल, असे नियोजन करावे. फारच आवश्यकता असेल तरच मुक्कामासाठी कर्जत किंवा अहमदनगरला जावे. हा मेळावा आपला असून तो यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांची आहे.’ दीड तास चाललेल्या या ऑनलाईन बैठकीचे सूत्रसंचालन परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केले. राज्यभरातील पदाधिकारी बैठकीमध्ये त्यांच्या जिल्ह्यातून किती पत्रकार कार्यक्रमासाठी येणार आहेत, याची माहिती दिली. कर्जत मेळावा नियोजन समितीचे अध्यक्ष गणेश जेवरे यांनी ७ एप्रिलच्या कार्यक्रमाच्या आतापर्यंत झालेल्या तयारीची बैठकीत माहिती दिली. राज्य सरचिटणीस मन्सूरभाई शेख व विजयसिंह होलम यांनी मेळाव्याच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या बाबी, निवासव्यवस्था आदींबाबत सविस्तर माहिती दिली.
***