शरद पवार यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये बैठक, संजय राऊत उपस्थित राहणार? : EVM चा मुद्दा ही तापणार
लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. देशात २०२४ मधील निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारची सत्ता उलथवून देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकजुटीनं प्रयत्न करायला हवेत, असा सूर उमटतोय. आणि म्हणूनच आज खा.शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची एक बैठक होते आहे.या बैठकीला शिवसेनेचे नेते संजय राऊत हे देखील उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे सरकार हटवण्यासाठी काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरु आहेत. देशभरात भाजपविरोधी नेत्यांवरील कारवाया आणि छापेमारीचं वातावरण तापलं असतानाच दिल्लीत आज एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनुभवी राजकारणी अशी ओळख असलेले शरद पवार या बैठकीचं नेतृत्व करत आहेत. देशातील विरोधी पक्षांचे बहुतांश नेते आज २३ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील. शिवसेना खासदार संजय राऊत या बैठकीला उपस्थित राहणार का, अशी चर्चा आहे. स्वतः राऊत यांनीच या प्रश्नाचं उत्तरं दिलंय.
संजय राऊत बैठकीला जाणार?
शिवसेना खासदार संजय राऊत दिल्लीतील विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई या बैठकीला जातील.
EVM चा मुद्दा तापणार?
दिल्लीत होणाऱ्या आजच्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक व्होडिंग मशीनचा मुद्दा महत्त्वाचा असेल, असं सांगण्यात येतय. तसंच इतरही राजकीय मुदद्यांवर चर्चा होईल. निःपक्षपाती निवडणूक पार पडण्यासाठी ईव्हीएम यंत्रणा अचूक आणि कार्यक्षम असावी लागते. त्यावर काही शंका असल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्ष घालणे आवश्यक आहे, अशी विरोधकांची मागणी आहे. आजच्या दिल्लीतील बैठकीत काही तज्ज्ञ आणि क्रिप्टोग्राफर्स उपस्थित असतील .चिप बसवलेल्या कोणत्याही मशीनला हॅक करता येते, यासंदर्भात ते माहिती देतील, असं सांगण्यात येतंय.
संजय राऊत काय म्हणाले?
दिल्लीतील बैठकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ आज विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. अनिल देसाई उपस्थित राहणार आहेत. ईव्हीएम कशी हॅक होते हे दाखवणार आहे. निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या ही लोकांची भावना आहे.आपण मतदान करतो ते ज्यांना केलं ते त्यांना मिळतं का नाही याबाबत लोकांमध्ये शंका आहे. शंका असेल तर ती लोकशाही नाही. जगभरात ईव्हीएम बाद केलं आहे. मोदींच्या प्रिय अमेरिका आणि रशिया युरोपातही. त्यामुळे भारतात असा हट्ट का करतात, त्यावर शंका आहे. बैठकीत काय होईल ते पहावं लागेल.