पुरंदर मधील शेतकऱ्याला १०० किलो वांग्याला मिळाले ६६ रुपये..! शेतकऱ्याची सटकली त्याने पीकच टाकले उपटून
सासवड दि.२७
राज्यामध्ये ८०० किलो कांद्याचे ३ रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचे समोर असताना आता पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याला १०० किलो वाग्याला फक्त ६६ रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये हा प्रकार घडला आहे. तिथेच वांग्याची विक्री करण्यात आली आहे. या प्रकाराने शेतकऱ्याने संतप्त होत वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण गावातील नाना तिवटे हे शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात ११ गुंठ्यांत वांग्याचे पीक लावले होते. वांग्याला चांगला बाजारभाव मिळेल या हेतूने त्यांनी पीक चांगले खत औषधे वापरून मोठे केले. या ११ गुंठ्यांत पीक देखील चांगले आले. १०० किलो वांगे निघाले ते विक्री साठी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे नेले मात्र त्याला बाजारभावच मिळाला नाही. तीन महिने मेहनत करून १०० किलो वांग्याना फक्त ६६ रुपये मिळाले. यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. या रागात त्याने शेतात पिकवलेले वांग्याचे पीक स्वतः जावून उपटून टाकले. साधा काढणीचा खर्च सुद्धा निघाला नसल्याची भावना शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.
राज्यात सरकार सद्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत असून अनेक पिकांना बाजारभाव मिळत नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आक्रमक होत आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, आमच्या मालाला हमीभाव मिळवून द्यावा यासाठी प्रयत्न करावे,नाही तर आम्हाला अशीच शेतातील पीक उपटून फेकून द्यावी लागतील.
पुणे जिल्ह्यात अशी घटना घडल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पुरंदर हे प्रगतशील शेतकऱ्याचा तालुका म्हणून ओळखला जातो. पुरंदरचा अंजीर हे जगात ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांना जागतिक बाजारपेठ निर्माण झाली आहे. मात्र तरकारी पिकांना एवढा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.