पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी समाज काय करणार आहे?
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचा समाज घटकांना सवाल
सासवड दि.८
रत्नागिरी- समाजस्वास्थ्य आणि माध्यम स्वातंत्र्याबरोबरच लोकशाही टिकली पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं अशा सर्वांसाठी शशिकांतची हत्त्या हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असला पाहिजे....भूमिका घेणारी व्यक्ती एकटी नाही हा संदेश जोपर्यंत राज्यकर्त्यांपर्यत पोहोचणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार असल्याने लोकहितासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटनांनी पत्रकार शशिकांतच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुढं आलं पाहिजे.. असं झालं नाही तर कोणताही पत्रकार कोणत्याच विषयावर भूमिका घेणार नाही.. मग पत्रकार भूमिका घेत नाहीत हा टाहो देखील आम्ही ऐकून घेणार नाही.. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी समाज काय करणार आहे? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी समाज घटकास केला आहे.
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, विरोधी भूमिका घेणारा पत्रकार कोणत्याच नेत्याला अथवा राजकीय पक्षाला आवडत नाही.. शशिकांत वारिशे यांनी तर राजकीय पक्षांचे हितसंबंध ज्या रिफायनरीत गुंतलेले आहेत त्याला विरोध करणारी भूमिका घेतली होती.. ही भूमिका भुमीपूत्रांच्या हिताची असली तरी ती दलाल आणि धनदांडग्यांना पचणारी नव्हती.. एक पत्रकार समाजहिताची भूमिका घेऊन सातत्यानं त्याविरोधात आवाज उठवतो आहे, त्याच्यामुळे आपले हितसंबंध धोक्यात येत आहेत हे पाहून पित्त खवळलेले दलाल आणि हितसंबंधी यांनी शशिकांत वारिशे यांचा आवाज कायमसाठी बंद करण्याचं षडयंत्र रचलं आणि ते प्रत्यक्षात आणलं देखील.. रत्नागिरी -राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसा ढवळया हत्त्या करणाऱ्या रिफायनरीचा दलाल पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. अपघाताचा बनाव करून पत्रकाराची ठरवून हत्त्या केल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाल्यानंतर आंबेरकर विरूध्द खुनाचे कलम लावण्यात आले आहे..
रत्नागिरी येथील सर्व पत्रकार तसेच मराठी पत्रकार परिषदेने देखील पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.. या दबावाचा अखेर फायदा झाला असून पोलिसांनी आंबेरकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.. आंबेरकर याच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम देखील लावले जावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली आहे... पत्रकारांकडून समाजाच्या भरपूर अपेक्षा असतात.. त्या रास्त ही असतात.. परंतू समाजाच्या या अपेक्षा पूर्ण करताना पत्रकारांचे जेव्हा बळी जातात किंवा पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा समाजाची भूमिका काय असते? अनेकदा असं दिसून आलंय की, समाज शांत असतो..मला काय त्याचे हीच समाजाची भूमिका असते.. रिफायनरी विरोधात सातत्यानं लिहिणाऱ्या शशिकांतची हत्या झाल्यानंतर समाजातून किंवा समाजहिताचं काम करणाऱ्या संस्था, संघटनांकडून निषेधाचा सूर अजून तरी व्यक्त झालेला नाही.. आम्ही पत्रकार घटनेचा निषेध करणारच पण हा केवळ एका घटका पुरता मर्यादित विषय आहे का? तर नाही.. असे आम्हाला वाटते.