'राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत' : एस.एम. देशमुख
मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पुरंदरच्या पत्रकार भवनाच्या स्थळाची पाहणी
पुरंदर :
'पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी एकत्रीत येत पुणे-पंढरपूर पालखी मार्गालगत स्वमालकीची सहा गुंठे जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी सर्व सोईंयुक्त, देखणी व भव्य वास्तू होत आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी लगत असलेल्या या पत्रकार भवनाचा लाभ राज्यभरातील पत्रकारांसह यात्रेकरूंना होणार आहे. राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत, असाच आदर्श राज्यातील इतर पत्रकारांनी ही घ्यावा' असे प्रतिपादन एस. एम. देशमुख यांनी पुरंदरमध्ये केले.
मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित पुरंदर तालुका पत्रकार संघाने सहा गुंठे जागा खरेदी करुन भव्य इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. या इमारतीचे भुमिपूजन रविवार दि. ०५ रोजी माजी केंद्र मंत्री शरद पवार व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नियोजित पत्रकार भवनाच्या स्थळाची पाहणी परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली.
यावेळी परिषदेचे पश्चिम विभागीय सचिव अरुणनाना कांबळे जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर, सोशल मिडिया उपाध्यक्ष राहुल शिंदे, प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अविनाश अदक, रोहित खरगे, राजू वारभूवन उपस्थित होते. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, उपाध्यक्ष प्रविण नवले, सचिव अमोल बनकर, सहसचिव मंगेश गायकवाड, खजिनदार निलेश भुजबळ, प्रकश फाळके, समिर भुजबळ, महावीर भुजबळ, हणुमंत वाबळे आदींनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन नियोजित पत्रकार भवनाच्या बांधकामाची माहिती दिली.
पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे मागील काही दिवसांपासून आजारी होते. भोंगळे यांची परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सासवड येथे भेट घेतली.