40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) एकत्र येत गेल्या वर्षी राज्यात मोठं सत्तांतर घडून आणलंय.
जमीन घोटाळा, कृषी महोत्सवासाठी वसूली, महिला खासदाराबाबत अपशब्द यावरुन
विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना घेरण्यात आले होते.
याबाबत बोलताना आपल्या विरोधात कट रचला असून यामध्ये पक्षातील नेत्यांचा हात आहे
का? असा संशय सत्तार यांनी व्यक्त करत शिंदे गटावरच नाराजी व्यक्त
केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचे
म्हटले होते.
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
"मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर
आमची बैठक झाली. त्याची माहिती लगेचच बाहेर कशी आली? आपले
लोक लगेच बाहेर काढतात. अंतर्गत चर्चा बाहेर नाही काढली पाहीजे. आमच्यातले कुणी
काय करत असेल तर माहीत नाही. राजकारणामध्ये राज करण्यासाठी काही कारणे शोधावी
लागतात, तसे काहीजण करत आहेत," असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले
होते.
शिंदे गटाकडून भूमिका स्पष्ट
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या
दाव्यानंतर शिंदे गटातील इतर नेत्यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. "अब्दुल
सत्तार अनेकवेळा गमतीने बोलतात. त्यामुळे ते किती गंभीरतेने घ्यायचे याबद्दल मला
माहीत नाही. काही झाले असेल तर त्यात लक्ष घातले जाईल. पण पक्षांतर्गत झालेल्या बाबींवर
बाहेर चर्चा करायची नसते," असे शालेय शिक्षणमंत्री दीपक
केसरकर यांनी म्हटले आहे. तर पक्षांतर्गत गैरसमज असतील तर ते दूर केले जातील.
आमच्या 50 लोकांमध्ये कुठलाही गैरसमज नाही, असे
स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे.
"सरकारवर न्यायालयाच्या निकालाची टांगती
तलवार"
"शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये
एकप्रकारची अस्वस्थता आहे. एकमेकांची उणुदुणी काढली जात आहेत असे अब्दुल सत्तार
यांनीच सांगितले आहे. न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार अजूनही यांच्यावर आहे.
न्यायालयाचा काय निकाल येतो त्यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. अशा
स्थितीमध्ये अस्वस्थता वाढली तर हे सरकार कोसळू शकते," असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.