धक्कादायक ! पोटाच्या मुलीचा खून
बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनीच केला खून
पुणे, दि. २७ (न्युज मराठी)
नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात ऑनर किलिंगच्या प्रकारानं खळबळ उडाली आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे कुटुंबीयांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
मुलीच्या प्रेमामुळे संतापलेल्या वडील, भाऊ आणि मामांनीच मुलीची हत्या केली आणि गुपचूप मृतदेह जाळून टाकला. शुभांगी जोगदंड असे मुलीचे नाव असून, ती BHMS च्या तिसऱ्या वर्षां शिकत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय शुभांगी ही BHMS च्या
तिसऱ्या वर्षांत शिकत होती आणि तिचे गावातील एका
तरुणासोबत प्रेम जुळले. कुटुंबीयांना त्यांचं नात मान्य नव्हतं. यानंतर घरच्यांनी तिचं दुसरीकडे लग्न जुळवलं, पण तिनं हे लग्न मोडलं. यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी झाली, या रागातून आरोपी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भावांनी मुलीला ठार मारलं.
शुभांगीची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिला शेतात नेऊन जाळलं आणि तिची राख ओढ्यात फेकून दिली. तीन-चार दिवसांपासून गावातील मुलगी अचानक गायब झाल्यामुळे गावातील लोकांना संशय आला. यानंतर काही नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि हा धक्कादायक ऑनर किलिंगचा प्रकार उघड झाला. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.