Type Here to Get Search Results !

पैज लागली लाखाची... 2024 चा आमदार कोण? पवार-शिंदेंमध्ये 'काँटे की टक्कर'

 


हमदनगर/जामखेड : २०२४ मधील विधानसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्ष वेळ आहे. मात्र कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण आताच तापू लागले आहे.

यातूनच विकासकामांचा श्रेयवादही चांगलाच पेटला आहे. काही कामांना स्थगिती, तर काही कामे आमच्याच काळात मंजूर झाली, असा दावा नेत्यांसह कार्यकर्तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून करू लागले आहेत. अशातच दोन कार्यकर्त्यांनी तर येत्या विधानसभा निवडणुकीत आपलाच नेता निवडून येईल यासाठी तब्बल एक लाख रूपयांची पैज लावून धनादेश मध्यस्थाकडे दिले आहेत.

कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या अनेक कामांवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे. दोन्ही आमदारांमध्ये जशी श्रेयवादावरून लढाई आहे तशीच कार्यकर्त्यांमध्येही हीच लढाई आहे. एखाद्या विकासकामाबाबत एखादी 'पोस्ट' सोशल मीडियावर पडली की लगेच दावे-प्रतिदावे सुरू होतात. विरोधक सत्ताधारी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर मेसेज येत आहेत. हे काम आमचेच पैस आहे, असे सांगितले जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर राजकीय वादविवाद सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी, रस्ते आदी अनेक कामांबाबत श्रेयवादाची लढाई सुरू आहे. आता तर ही लढाई पैजेवर गेली आहे. लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत.

आमदार रोहित पवार समर्थक अरणगाव येथील विशाल डोळे, तर आमदार प्रा. राम शिंदे समर्थक वंजारवाडी येथील प्रदीप (बंडू) जायभाय या दोघांची एक लाख रुपयांची पैज लागली आहे. त्यांची ही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत आहे. विशाल डोळे म्हणतात, आमदार रोहित पवार विजयी होणार, तर प्रदीप जायभाय म्हणतात, आमदार राम शिंदेच निवडून येणार. दोघांमध्ये एक लाख रुपयांची पैज लागली असून, त्यांनी याबाबतचा धनादेश मध्यस्थ विष्णू जायभाय यांच्याकडे दिला आहे. याचीच चर्चा सध्या जामखेड तालुक्यात सुरू आहे.

विकासकामे ठप्प होण्याची भीती?

शिंदे व पवार यांच्यातील श्रेयवादामुळे कर्जत-जामखेड तालुक्यातील विकासकामांवर परिणाम होऊ लागला आहे. हा वाद असाच वाढू लागल्यास विकासकामे ठप्प होतील की अशी भीती आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. श्रेय कोणीही घ्या मात्र आमची कामे पूर्ण करा, अशी भावना आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies