Type Here to Get Search Results !

"दोन वर्षांत तुम्हाला देईन उज्ज्वल भारत"; केसीआर यांचा आता राष्ट्रीय राजकारणासाठी प्लान

 


हैदराबाद : तेलंगणामध्ये यशस्वीपणे सरकार चालवणारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) लवकरच देशव्यापी संघटना बनवण्यासाठी ठोस मोहीम राबविणार असून, याची सुरुवात सर्वाधिक संकटग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या महाराष्ट्रातून होईल, असे बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले.

मला दोन वर्षे द्या, मी उज्ज्वल भारत देईन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत राव म्हणाले की, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब अबचलनगर साहिब हे शिखांच्या पाच तख्तांपैकी एक तख्त असलेल्या नांदेड येथून पक्ष विस्ताराची सुरुवात करणार आहोत. तेलंगणाचा यशस्वीरित्या विकास केल्यानंतर तेथील मॉडेल देशभरात गाजत असून, भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणासाठी 'प्लान' तयार केला आहे. यासाठी देशातील सहा लाख गावांमध्ये भारत राष्ट्र समिती पोहोचवण्यात येणार असल्याचेही त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.

बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 'लोकमत'शी खास बातचित केली. ते म्हणाले. भारतात दाेन लाख ५० हजारांहून अधिक ग्रामपंचायती आहेत, ज्या सहा लाख ६४ हजारांहून अधिक गावांचा कारभार सांभाळतात. बीआरएस पक्षाची शेतकरी शाखा भारत राष्ट्र किसान समितीच्या (बीआरकेएस) देशात सहा लाखांहून अधिक गावांमध्ये शाखा उघडणार आहे. आम्ही सात- आठ राज्यांपासून सुरुवात करत आहोत. महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, ओडिशा, पंजाब, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे प्रथम समित्या स्थापन करणार आहोत. नंतर मध्य प्रदेश आणि हळूहळू संपूर्ण भारतात जाऊ. अशा प्रकारे, बीआरएसची उपस्थिती देशभर असेल, असे केसीआर यांनी ठामपणे सांगितले.

पंजाब आणि दिल्ली सीमेवर झालेले शेतकरी आंदोलन मोजक्या राज्यांतील लोकांचे आंदोलन होते. देशातील इतर राज्यांचे आणि विशेषत: ईशान्येचे काय? त्याच्या 'तुकडे तुकडे' गटांनी ते आंदोलन कुचकामी बनवले, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तेलंगणा हे छोटे राज्य आहे. स्थापनाही अगदी अलीकडेच झाली. त्याची तुलना महाराष्ट्राशी करा. इतर राज्यांपेक्षा अनेक बाबतींत उजव्या असलेल्या महाराष्ट्रातही तेलंगणात केले तसे करता येणार नाही, का? नेमकी कशाची कमतरता आहे? आता लोक तेलंगणा मॉडेलची चर्चा करीत आहेत. महाराष्ट्राच्या सीमाभागातील काही गावांनी तेलंगणामध्ये येण्यासाठी आवाज उठवला. यामुळे तेथील दयनीय स्थितीने अधिकाऱ्यांचे डोळे उघडले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

चार नद्या जरी जोडल्या तरी...

देशाला उंचीवर नेण्यास रॉकेट सायन्सची गरज नाही. लास वेगाससाठी अमेरिकेने ६०० किमीवरून पाणी आणले. उत्तर चीनमध्ये तेथील सरकारने १,६०० किमीवरून पाणी पोहोचविले. याला म्हणतात सरकार. आपल्याकडे गंगा, महानदी, कावेरी, गोदावरी व इतर अनेक नद्या आहेत. चार नद्या जरी जोडल्या तरी अतिरिक्त पाणी असेल, असा विश्वास केसीआर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राने एक थेंबही पाणी घेतले नाही...

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचा संदर्भ देताना के. चंद्रशेखर राव म्हणाले की, एकदा मी त्यांना भेटलो होतो. आपण युद्धासाठी भेटत आहोत की काय, असे वाटले होते. मी तुमचा शेजारी असल्यामुळे प्रेम सोबत घेऊन आलो आहे, असे त्यांना सांगितले. आपण खुल्या मनाने बोलले पाहिजे. हजारो किलोमीटरची सीमा एकच असल्यामुळे एकत्रित राहिले पाहिजे. जुनी कटुता विसरायला पाहिजे. अखेर कालेश्वरम प्रकल्पाबाबत एक करार झाला. मी त्यांना सांगितले की, गडचिरोली हा मागास जिल्हा आहे. तेथे पाणी देण्याची तयारी दाखवली; पण महाराष्ट्राने एक थेंबही घेतला नाही, असे केसीआर म्हणाले.

शेतकरी आत्महत्या हे योग्य नाही...

लोक सर्वकाळ सरकार अस्थिर करण्यासाठी व ईडी, सीबीआयकडून टार्गेट ठरविण्यात गुंतलेले आहेत. या स्थितीत त्यांना लोकांनी निवडून का दिले असा प्रश्न पडतो. एकदा विकास झाला की, नक्षलवादासारख्या समस्या जिल्ह्यातून नष्ट होतील. राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, हे महाराष्ट्रासारख्या राज्याला लाजिरवाणे आहे, असेही केसीआर म्हणाले.

महाराष्ट्रात काय करणार?

तेलंगणात सरकारने राबवलेली पक्षाची धोरणे, प्रकल्प आणि योजना यांचा धांडोळा महाराष्ट्रातील लोकांसमोर मांडणार. नांदेडबरोबरच मी महाराष्ट्रातील इतर भागांनाही लवकरच भेटी देणार आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या सीमाभागातील काही गावांतील लोक मला भेटले. बीआरएसचा ध्वज वापरण्याची आणि भागातील लोकांच्या कल्याणासाठी लढण्याची परवानगी मागितली.

निवडणुका जिंकण्यास वाट्टेल ते.

निवडणुका जिंकण्यासाठी नेते प्रत्येक खोडसाळ युक्त्या अवलंबत आहेत. त्यांना कोणत्याही किमतीत निवडणुकीत विजय मिळवायचा आहे. हेच या गौरवशाली राष्ट्राचे उद्दिष्ट आहे का? जाती- धर्माच्या नावावर फूट पाडणे हे त्यांच्या हिताचे असू शकते; पण देशहित नाही, असे मत बीआरएसप्रमुखांनी व्यक्त केले.

१६ राज्यांच्या मुख्य सचिवांकडून शुभेच्छा

नीती आयोगाच्या एका बैठकीत मी एकमेव मुख्यमंत्री होतो, जो देशाचा विकास आणि राष्ट्रीय ध्येय याबाबत बोललो होतो. त्यानंतर १६ ते १७ राज्यांच्या मुख्य सचिवांनी मला शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies