पुणे -शहरातील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 3 आणि हवेली क्रमांक 24 येथे बोगस एनए ऑर्डर, भोगवटापत्र, नियमितीकरण दाखला जोडून 115 दस्तनोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये 26 प्रकरणांमध्ये 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून, उर्वरित 86 प्रकरणांची पडताळणी सुरू आहे.
दस्त
नोंदणीसाठी बनावट दाखला जोडून दस्तनोंदणी केल्याप्रकरणी विधिमंडळाच्या अधिवेशनात
प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री विखे पाटील
यांनी ही माहिती दिली. शहरातील हवेली क्रमांक 24 कार्यालयात बोगस एनए ऑर्डर जोडून दस्तनोंदणी केल्याची तीन प्रकरणे
आढळून आली. त्यानंतर दि. 27 जानेवारी 2022 रोजीच्या पत्रानुसार विशेष तपासणी पथक स्थापन केले होते. या
पथकाने केलेल्या तपासणीमध्ये हवेली क्रमांक 3 या
कार्यालयातील दि. 5 ऑक्टोबर 2021 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत नोंदविलेल्या दस्तांची तपासणी केली असता
त्यामध्ये बोगस एनए ऑर्डर जोडून 112 दस्त
नोंदविल्याचे आढळून आले. तर हवेली क्रमांक 24 येथे तीन
दस्त नोंदविल्याचे आढळले आहे. या दाखल्याची सत्यता पडताळणी होऊन 26 प्रकरणांमध्ये 11 गुन्हे
हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 86 प्रकरणांमध्ये एनए ऑर्डर, भोगवटापत्र, नियमितीकरण
दाखल्यांची सत्यता पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, पिंपरी-चिंचवड
महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. या प्रकरणांची सत्यता
पडताळणी होऊन आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे विखे
पाटील यांनी सांगितले.