पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या २७५ पत्रकारांची झाली आरोग्य तपासणी
३ डिसेंबर रोजी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त एस.एम. देशमुख सर यांनी पत्रसृष्टीला केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद
पुणे :
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजे ३ डिसेंबर २०२२ रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने केला होता. आज राज्यभरातील सुमारे ०७ हजार पत्रकारांची तपासणी झाली. हा एक प्रकारे विश्वविक्रमच आहे. पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका संघांनी सुमारे २७५ पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. उर्वरित तालुका पत्रकार संघ पुढील आठवड्यात आरोग्य तपासणी शिबिर घेणार आहेत. अशी माहिती पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी दिली.
पत्रकारांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्यातील सर्व जिल्हा, तालुका संघांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू-भगिनींचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, पुणे विभागीय सचिव अरुणनाना कांबळे, संघटक सुनील वाळुंज, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी अभिनंदन केले आहे.
३ डिसेंबर १९३९ रोजी मराठी पत्रकार परिषदेची मुंबईत स्थापना झाली. काकासाहेब लिमये हे परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. तेव्हा पासून गेली ८३ वर्षे परिषदेची अखंड वाटचाल सुरू आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी परिषद ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन दरवर्षी राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी राज्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते. असा उपक्रम राबविणारी मराठी पत्रकार परिषद ही देशातील पहिली आणि एकमेव पत्रकार संघटना आहे.
पत्रकारांचे आपल्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. वेळीच काळजी न घेतल्यानं आणि दुर्लक्ष केल्याने छोटे आजार नंतर बळावत जातात आणि मग हाताबाहेर जातात हे टाळण्यासाठी परिषद आरोग्य तपासणी शिबिरं घेते. यावर्षी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्यावतीने एकाच दिवशी ही शिबीरं आयोजित करण्यात येणार आहेत. या तपासणीतून कोणी गंभीर आजारी असल्याचे स्पष्ट झाल्यास मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील सरकारी आरोग्य कक्ष तसेच परिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख दीपक कैतके यांच्या माध्यमातून पुढील उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी झालेली संख्या तालुकानिहाय पुढील प्रमाणे -पुरंदर - ६० शिरूर- ५०, वेल्हे -१०, बारामती- २०, दौंड -३०, लोणावळा - २१, आंबेगाव- ४९, इंदापूर- ३५ एकूण - २७५
भोर, जुन्नर, पिंपरी चिंचवड, चाकण, पुणे शहर पत्रकार संघ उद्यापासून पुढील आठवडा संपेपर्यंत सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार आहेत.
पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य, पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकारी पत्रकार बंधू-भगिनींचे मनापासून हार्दिक अभिनंदन मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले.