एका घटनेनं जालना जिल्हा हादरुन गेला आहे. जन्मदात्या पित्यानंच आपल्या 17 वर्षीय लेकीची बदनामीच्या भीतीनं हत्या केली आहे.
जालना
तालुक्यातील पीर-पिंपळगाव येथे ही घटना घडली असून पोलिसांनी मयत मुलीचे वडील संतोष
सरोदे आणि तिचे काका नामदेव सरोदे यांच्या विरोधात चंदन जीरा पोलीस ठाण्यात
हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मयत 17 वर्षीय तरुणी तीन दिवसापूर्वी घरातून निघून गेली होती. ती घरी
आल्यानंतर तिची विचारपूस केली असता एका जवळच्याच नातेवाईकाच्या मुलाबरोबर ती गेली
असल्याची माहिती तिच्या वडिलांना समजली. दरम्यान अपमानाच्या भीतीने वडिलांनीच
आपल्या शेत वस्तीवर तिला गळफास देऊन जीव घेतला. यानंतर काल संध्याकाळी तिला जाळून
टाकून तिचा अंत्यविधी देखील उरकला.
दरम्यान
गावातील लोकांना या गोष्टीची कुणकुण लागल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क केला, याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता मयत मुलीच्या वडिलांनी आणि
काकांनी सदर मुलीची हत्या करून तिची राख पोत्यात भरून ठेवल्याच दिसलं. ही हत्या
केल्याचं देखील क्रूरकर्मा वडील आणि चुलत्यानं पोलिसांसमोर कबूल केलं. या प्रकरणी
पोलिसांनी चंदन जीरा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला
आहे.
कशी केली हत्या..
मयत अल्पवयीन तरुणीच्या वडिलांनी
पोलिसांना दिलेल्या कबुली जवाबानुसार 13 डिसेंबर
रोजी मुलीला दुपारी घरी आल्यानंतर तिची विचारपूस केली. ती न सांगता घरातून निघून
गेल्याने तिच्यासोबत मोठा वाद झाला. या घटनेने आपला अपमान झाला असल्याने सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास मुलीला शेतवस्तीवरील कडुलिंबाच्या झाडाला
दोरीने गळफास देऊन ठार मारले. तसेच संध्याकाळी उशिरा तिचा मृतदेह जाळून टाकला.
यानंतर तिची राख दोन पोत्यांमध्ये भरून ठेवल्याचं आरोपी पित्यानं पोलिसांना
सांगितलं. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर
हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या
घटनेनं जालना जिल्हा हादरुन गेला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.