नवी दिल्ली, 12 डिसेंबर : धनुष्यबाण कुणाला मिळणार? या वादावर आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात फैसला होणार आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून कागदपत्र दाखल केली आहे.
आज दोन्ही गटाकडून युक्तिवाद
करण्यात आला आहे. पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार
आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या पक्षचिन्हाच्या हक्कावर आज आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगात सुनावणी
झाली. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही
पक्षांचे प्रतिनिधी या सुनावणीच्या वेळेस निवडणूक आयोगात उपस्थित होते.
सोबतच वकिलांची फौज देखील आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
मात्र बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते. दोन्ही
गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज हजर होती.
या प्रकरणावर आता पुढील सुनावणी
ही जानेवारी महिन्यात होणार आहे, पहिल्या आठवड्यात यावर चर्चा होणार आहे, कोणत्या पक्षाने किती सदस्यांनी
माहिती दिली, किती कागदपत्र सादर केली, याबद्दल पुढील सुनावणीमध्ये
चर्चा होणार आहे. अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या
वतीने जवळपास 15 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र आणि तीन लाखाच्या जवळपास
शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आतापर्यंत सादर करण्यात आलेले आहे. त्याच
बरोबर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने 7 लाख सदस्यांची नावे केंद्रीय
निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे.
ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा
दुप्पट सदस्यांची यादी दिली आहे. आतापर्यंत ठाकरे गटाकडून 182 राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे पत्र, जवळपास 2 लाख 83 हजार पदाधिकाऱ्यांच्या
प्रतिज्ञापत्र आणि जवळपास 15 लाख प्राथमिक सदस्य नोंदणी निवडणूक आयोगाला सादर करणार आहे. त्यामुळे
निवडणूक आयोगाच्या कोर्टात शिवसेनेनं पारडं जड आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग
धनुष्यबाण आणि पक्षाचे नाव कोणाला द्यायचं यासंदर्भात निर्णय घेणार आहे.
शिवसेना आणि शिंदे गटामध्ये काय
आहे वाद? विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड केलं.
शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं, त्यामुळे महाविकासआघाडी सरकार
कोसळलं. यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतलं हे
बंड आमदारांपर्यंतच थांबलं नाही तर 18 पैकी 13 खासदारांनीही शिंदेंना साथ दिली, याचसोबत शिवसेनेचे पदाधिकारीही
शिंदे गटात दाखल झाले.
लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी
आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच दावा ठोकला. हा वाद सुप्रीम कोर्टात
गेल्यानंतर कोर्टाने निवडणूक आयोगाला याबाबत निर्णय घ्यायला सांगितला. शिवसेना
कुणाची हा वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक लागली, त्यामुळे निवडणूक आयोगाने
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि दोन्ही गटांना वेगवेगळी नावं
दिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ
शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं.
ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे
गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं. दोन्ही गटांकडून कागदपत्र दिल्यानंतर
निवडणूक आयोगात या कागदपत्रांची छाननी केली जाईल, त्यानंतर निवडणूक आयोग गरज पडली
तर संबंधित व्यक्तींना बोलवूनही घेऊ शकते. राज्यातल्या महापालिका निवडणुका पेंडिंग
आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाने निकाल दिला नाही तर या निवडणुका दोन्ही
पक्षांना मशाल आणि ढाल-तलवार यावर लढवाव्या लागू शकतात. बिहारमध्येही एलजेपीवरून
चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांच्यात वाद झाला. हा वाद निवडणूक आयोगात
पोहोचला, पण वर्षभरापेक्षा जास्तचा काळ झाला तरीही याबाबतचा निर्णय अजूनही
झालेला नाही. त्यावेळीही निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी नावं आणि चिन्ह
दिली.