एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन बसेसचा भरणा होत आहे. नव्या तंत्रज्ञानानुसार बसेसची बांधणी होत असताना कर्मचारी मात्र आधुनिक यंत्रणेच्या माहितीपासून अलिप्त असल्याचे निदर्शानास आले आहे.
शहरापासून
खेड्यापाड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एसटी बस वाहतुकीची नाळ
अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे. एसटी महामंडळाच्या
ताफ्यात सध्या १६ हजार बस आहेत. काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बससाठी हिरवा झेंडा
दाखवत पुणे ते अहमदनगर मार्गावर महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली. नुकतेच
डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी करण्यासाठी येत्या वर्षभरात १ हजार बसेस सीएनजीमध्ये
परावर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर महामंडळाने नादुरुस्त बसेसच्या
दुरुस्ती करण्यासोबत लवकरच एसटीच्या ताफ्यात वर्षअखेरीस ४ हजार नव्या बसगाडय़ा
दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. तर एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या
बैठकीत ४ हजार बस घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. वाढत्या
तंत्रज्ञानानुसार एसटी महामंडळ नवनवीन बदल करत आहे. विशेष म्हणजे प्रवास सुरक्षित
व्हावा यासाठी या गाड्यांमध्ये सर्व प्रकारच्या बसेसला ऑटोमॅटिक ब्रेक सेटिंग
पध्दतीचे स्लॅक अँडजेस्टर आहेत. परंतु याबाबत बहुतांश चालकांना माहिती नसल्याने
पुर्वीच्या पद्धतीने ब्रेक सेटिंग चालकांकडून केली जात आहे. ब्रेक सेटिंग हलवण्यात
येऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या असताना देखील
चालकांकडून अशा प्रकारची वर्तणूक होणे धोकादायक असून याचे परिणाम म्हणजे अपघाताला
आमंत्रण असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.
त्यामुळे अश्या चुकीच्या पद्धतीने कुणीही ब्रेक सेटिंग करु नये असे आवाहन एसटी
महामंडळाकडून करण्यात आले आहे.
सिगारेटचे कागद टाकुन तर कोणी लोखंडी पट्टी टाकून
करतात ब्रेक सेटिंग
नव्या
बसेसमध्ये ऑटोमॅटिक ब्रेक सेटिंग पध्दतीचे स्लॅक अँडजेस्टर असताना काही चालक
स्वतःच्या हाताने स्वतःच्या पध्दतीने ब्रेक सेटिंग करत असल्याचे निदर्शनास आले
आहे. मुळात ब्रेक किती सैल ठेवावे या डिजिटल ब्रेक सेटिंगबाबत ९० टक्क्यांहून अधिक
चालक ज्ञात नसल्याने कोणी जुन्या बसेसच्या ब्रेक यंत्रणेप्रमाणे ब्रेक सेटिंग करत
आहेत. यामध्ये कोणी सिगारेटचे कागद टाकत आहेत तर कोणी लोखंडी पट्टी टाकून ब्रेक
सेटिंग करत आहेत. मात्र या सर्व चुकीच्या पद्धती असून यामुळे ब्रेक सेटिंग असमान
होते. अनेक गाड्या जाम होतात. त्यामुळे लायनर गरम होऊन ग्रीस पातळ होते, ट्युबचे रबर गरम होऊन वितळुन कमजोर होते व टायर फुटण्याची पण
शक्यता असल्याचे एसटी महामंडळातील यंत्र विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून
सांगण्यात आले.