जळगाव | 8 डिसेंबर 2022| जळगावातील एका व्यापार्याकडून अडीच लाख रुपये उकळून बनावट नवरीसोबत लग्न लावून देण्यात आले. मात्र नवरीने पलायन केले. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात चौघा भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लग्नासाठी मुली मिळत नसल्याने
परराज्यातून किंवा परजातीच्या मुली शोधून त्यांच्याशी लग्न लावून देण्याचे प्रकार
जळगाव जिल्ह्यात नवे नाहीत. मात्र आता लग्नासाठी मुली मिळवून देण्याचे अमिष दाखवत
मॅरेज रॅकेटचे अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. लग्नासाठी बनावट नवरी उभी करुन लग्न
लावल्यानंतर दुसर्याच दिवशी पैसे व सोनं घेवून फुर्रर होण्याच्या घटना अलीकडच्या
काही महिन्यांमध्ये वाढल्या आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लग्नासाठी
मुली मिळत नसल्याचे चित्र आहे त्याचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी मॅरेज रॅकेट नावाचा
गुन्हेगारी प्रकार सुरू झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातही लग्नासाठी मुली मिळवून
देण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. मुलीच्या सौंदर्यानुसार व मुलाच्या ऐपतीनुसार
नवर्या मुलीचे दर ठरवले जात आहेत. मराठवाडा, सोलापूर, सांगली तसेच मध्यप्रदेश व कर्नाटकमधूनही
मुलींचा लग्नासाठी एजंटांमार्फत सौदा केला जात आहे. एक लाखापासून ते दहा लाखांपर्यंत
नवर्या मुलीच्या कुटुंबाला पैसे दिले जात आहेत. यामध्ये एजंट सांगतील तेवढे पैसे
गरजवान मुलाला मोजावे लागत आहेत. मात्र लग्न लावून दिल्यानंतर दुसर्या किंवा
तिसर्याच दिवशी नववधू पळून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
तरुणांच्या लग्नाचे सरासरी वय
३०-३५च्यावर पोहचले
एका अहवालानुसार, ग्रामीण भागातील
तरुणांच्या लग्नाचे सरासरी वय २१-२२ वर्षावरून थेट ३०-३५च्या घरात पोहचलंय. ही
समस्या फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात पण दिसून येते पण ग्रामीण भागातील
ही समस्या प्रकर्षाने जाणवते. उच्च शिक्षित तरूणांनासुद्धा मुलींसाठी वणवण करावी
लागतेय. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालानुसार, लिंग गुणोत्तर प्रमाण हे पुरुषांपेक्षा
महिला कमी असे असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींचे कुटुंबीय मुलींसाठी अधिक चांगले
स्थळ शोधू लागले. म्हणून बेरोजगार आणि शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण
गोष्ट बनली आहे.
अशी टाळू शकता फसवणूक
ग्रामीण भागातील मुलांना लग्नासाठी मुली
मिळत नाहीत हे भयानक वास्तव आज खेडोपाडी बघायला मिळत आहे. यामुळे मध्यस्थामार्फत
लग्न जुळवतांना मुलगी व तिच्या परिवाराची पूर्ण खात्री करुन घ्या. शक्यतो
आधारकार्ड व अन्य कागदपत्रे देखील मध्यस्थामार्फत मागवून त्याची योग्य तपासणी करा.
लग्न लावतांना घाईघाईत किंवा परस्पर लावू नका. कायदेशिर कार्यवाहीपूर्ण करुन लग्न
लावा. थोडी जरी शंका आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा.