मुंबई 08 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत समोर आलेले कल बघता गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे.
मात्र, हिमाचलमध्ये भाजपला मोठा धक्का
बसला आहे. हिमाचलमध्ये भाजपला पिछाडीवर टाकत काँग्रेसने आघाडी मिळवली आहे.
त्यामुळे भाजपच्या सर्वोच्च पदावरील नेत्याच्या होम ग्राऊंडवरच भाजपला मोठा धक्का
बसल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा निवडणुकीच्या
प्रचारासाठी सर्वत्र फिरले, पण भाजपला त्यांच्याच राज्यात विजय मिळवता आला नाही.
भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी
भरपूर प्रयत्न केले होते. या निवडणुकीत भाजपचे सर्वच मोठे चेहरे प्रचार करताना
दिसले. पण तरीही हिमाचलमध्येच भाजपला पराभवाचा धक्का बसत असल्याचं पाहायला मिळत
आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची मागणी होत होती, परंतु भाजप हायकमांडने त्याकडे
दुर्लक्ष केलं.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
यांच्यासह अनेक मंत्री भाजपच्या प्रचारासाठी हिमाचलमध्ये तळ ठोकून होते.
हिमाचलमध्ये यावेळी नियम किंवा प्रथा बदलणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.
एक्झिट पोलनुसार भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढाई होणार असं दिसत होतं.
मात्र, आता काँग्रेसने आघाडी घेतली आहे.
हिमाचल प्रदेशचा इतिहास - हिमाचल प्रदेशात सध्या भाजपचं
सरकार आहे. हिमाचलमध्ये 1985 नंतर दर पाच वर्षांनी सत्ता बदलते, असा इतिहास आहे. त्यामुळे
प्रथेनुसार यावेळीही इथल्या लोकांनी सरकार बदलण्यासच पसंती दिल्याचं दिसत आहे.
हिमाचल प्रदेशात भाजपने गेल्यावेळी 44 जागा मिळवल्या होत्या. तसेच
जयराम ठाकूर हा नवीन चेहरा दिला होता. मात्र यावेळी भाजपला बहुमताचा 35 हा आकडा गाठणंही कठीण जाणार
असल्याचं चित्र आहे.