Type Here to Get Search Results !

उच्चशिक्षित तरुणीने नैराश्येतून आयुष्य संपवलं, कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी टोकाचं पाऊल

  


पालघर (Palghar) जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील निंबवली इथल्या एका उच्चशिक्षित तरुणीने नैराश्येतून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली.

या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून ममता परेड (वय 24 वर्षे) असं तरुणीचं नाव आहे.

वसई-विरार महापालिकेत पीआरची नोकरी

वाडा तालुक्यातील निंबवली इथे ममता परेड ही तरुणी आपल्या कुटुंबासह राहत होती. तिचे एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि ती पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. त्याचप्रमाणे तिने पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयामधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. ममताला वसई-विरार महानगरपालिकेत जनसंपर्क अधिकाऱ्याची नोकरी देखील लागली होती आणि ती आज सोमवारपासून (12 डिसेंबर) कामावर रुजूही होणार होती. परंतु तिने हे अचानक टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अजूनही स्पष्ट झाले नाही.

आईने ममताचा मृतदेह पाहिला

परेड कुटुंबातील सर्वजण शनिवारी (10 डिसेंबर) रात्री जेवण झाल्यानंतर झोपी गेले. मात्र, रविवारी (11 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास ममताची आई उठल्यावर तिला ममताने घराबाहेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर तिच्या आईने आरडाओरडा केला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ममताचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला.

ममता दोन महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये

ममता गेल्या दोन महिन्यांपासून नैराश्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. एका उच्चशिक्षित तरुणीने कामावर रुजू होण्याच्या एक दिवस आधी अशाप्रकारे आत्महत्या करुन आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून आकस्मिक मृत्युची नोंद

एखादी तरुणी उच्चशिक्षित होते आणि त्यानंतर तिला नोकरीची संधी मिळते. असं असतानाही हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत सर्वांच्या मनात साशंकता असून वाडा पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी महिला डॉक्टरची आत्मत्या

पालघरमध्ये दोन महिन्यांपूर्वी बीएएमएस एम.डी महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तृप्ती कौस्तुभ घरत (वय 28 वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे. पालघरमधील सुखशांतीनगर ही घटना घडली होती.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies