Type Here to Get Search Results !

विशाळगडावरील अतिक्रमणावर सर्जिकल स्ट्राईक; शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला मोकळा श्वास घेणार

 


 
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली आहे.

अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी  निर्वाणीचा इशारा दिला होता. गुरुवारी वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पक्की बांधकामे असणाऱ्या अतिक्रमणधारकांनी 15 दिवसांत बांधकामे काढून घ्यावीत, अन्यथा कारवाई करू, असा सूचित इशारा उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी दिला आहे.

वन विभागाने कारवाई सुरू केल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत. वनविभागाने गडबुरुजाजवळील शेड व पायथ्याजवळ शीतपेय दुकानच्या शेडवर कारवाई केली. पायथा परिसरात वन विभागाच्या मालकीच्या जागेत 20 हून अधिक अतिक्रमणे आहेत. नुकसान टाळण्यासाठी सर्व बांधकामे संबंधितांनी स्वतः 15 दिवसांत काढून घ्यावीत, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत अतिक्रमण कोणत्या पद्धतीने काढावे यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर कृती आराखडा निश्चित केला जाणार आहे.

महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण काढणार

दरम्यान, महाशिवरात्रीपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांनी संभाजीराजे छत्रपती  यांना दिले आहे. किल्ल्यावरील अतिक्रमणाला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे.संभाजीराजे यांनी किल्ल्यावर अतिक्रमण झाल्याचे सगळ्यांनी मान्य केल्याचे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, अनेक अवैध गोष्टी विशाळगडावर होत आहेत. किल्ल्यावर गचाळपणा काळात वाढला आहे. अतिक्रमणे हटवताना कुणाचा दबाव खपवून घेऊ नका हे सांगितलं आहे. हा दर्गा शिवाजी महाराजांच्या आधीपासून आहे. मात्र, त्यानंतर जे काही बांधलं आहे, जे अतिक्रमण केलं आहे ते काढलं पाहिजे. अतिक्रमण करण्यासाठी ज्यांनी परवानगी दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले.

गडावर शासकीय जागेत आणि पायथा परिसरात वन विभागाच्या जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ती काढण्याबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात कारवाई सुरु झाल्याने धाबे दणाणले आहेत. ग्रामस्थांनी सुद्धा अतिक्रमण झाल्याचे मान्य केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies