दुपारची सव्वा एकची वेळ...प्रवाशांनी खचाखच भरलेली बस... नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील चौफुलीवर आली असता, बस भरधाव वेगाने सुरु होती..अन् बसचे ब्रेक निकामी झाले...गतिरोधक असतानाही बस चालक बस रोखू शकला नाही, बस थेट पुढील शिवशाही बसवर आदळली.
पुण्याच्या
राजगुरूनगर आगाराची बस राजगुरूनगर हुन नाशिकला निघाली होती. नाशिक शहरानजीक असलेल्या शिंदे टोल नाका परिसरात
बस येताच चालकांना ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. याचवेळी गतिरोधक असल्याने
अनेक वाहनांचा वेग कमी झाला होता. मात्र हि बस थेट पुढे असलेल्या शिवशाही बसला
धडकली. मात्र याचवेळी नाशिकडे जात असलेल्या दोन दुचाकीस्वार या गाडीखाली आल्याने
बसने ब्रेक दाबल्यानांतर लागलीच बसने पेट घेतला. यात पल्सर दुचाकीची पेट्रोल टाकी
फुटल्याने बस अधिकच पेटली. यात दोन्ही दुचाकीवरील तरुणांचा अक्षरश कोळसा झाल्याचे
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर तातडीने स्थानिक रहिवाशांनी घटनेचे गांभीर्य
ओळखून बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जवळपास 43 हुन अधिक प्रवाशी बसमध्ये असल्याचे प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान बस अपघातानंतर जखमींना तातडीने बिटको हॉस्पिटल आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात
जखमींना दाखल करण्यात आले. अनेकजण कामानिमित्त, महाविद्यालयात, नातेवाईकाकडे
जात असल्याचे समजले. यातील अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून नाशिक जिल्हा
रुग्णालयात दाखल केलेल्या आजीबाईंनी अपघातांची आपबिती सांगितली. आजीबाईंसह त्यांची
बहीण या दोघी संगमनेरहून नाशिकला नातेवाइकांकडे निघाल्या होत्या. बारा वाजेच्या
सुमारास त्यांनी राजगुरूनगर-नाशिक बसमध्ये बसल्या. याचवेळी बस खाचखच भरल्याचे
त्यांनी सांगितले. अनेकजण उभे होते, तर अनेकजण
खाली बसून प्रवास करत होते. दरम्यान बस शिंदे टोलनाका क्रॉस केल्यानंतर शिंदे
गावाजवळील चौफुलीजवळ आली असता बसचा वेग अधिकच होता. अचानक मोठा बार झाला. आरडाओरड
सुरु झाली. आम्ही लागलीच हाती लागलं ते सामान घेऊन कसेबसे बसबाहेर आलो. जिवाच्या
आकांताने उसासा देखील टाकला जात नव्हता, असे आजीबाई
म्हणाल्या. काही वेळानंतर ऍम्ब्युलन्स आली, अन् आम्ही
दोघी दवाखान्यात आलो.
बरोबर दोन महिन्यानंतर बस फायर
सद्यस्थितीत घटनास्थळावरून कोळसा
झालेल्या बसचे अवशेष उचलण्यात येत असून काही वेळापूर्वी जिल्हाधिकारी गंगाथरण डी
यांनी भेट दिली. त्याचबरोबर पोलिस पथकाकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. जखमींवर
उपचार केले जात आहेत. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 08 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास बस आग अपघाताचा थरार
पाहायला मिळाला होता. औरंगाबाद महामार्गावर नांदूर नाका जवळील मिरची हॉटेल चौकात
देखील असाच अपघात घडला होता. ट्रकने खाजगी बसला धडक दिली होती. अपघात झाल्यानंतर
काही क्षणातच खाजगी बसने पेट घेतल्याने या 13 लोकांचा
मृत्यू झाला होता.दरम्यान सिन्नर नाशिक महामार्गावर देखील असाच भीषण अपघात झाला
असून या दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे
पुन्हा एकदा त्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. यात
महामंडळाच्या एसटी बसचा कागदासारखा पेट घेतला असून तात्काळ लोकांच्या सावधगिरीमुळे
मोठा अनर्थ टळला आहे.