दिंद्रुड (बीड) : माझ्या मुलांना उच्च शिक्षण द्यायच आहे, त्यांना अधिकारी करायचे आहे हे स्वप्न मनी बाळगत आईने दिवसरात्र शिवणकाम तर वडिलांनी शेतात काबाडकष्ट केले.
या कष्टाचे आता चीज झाले असून त्यांच्या
मुलाने सचिन व्यंकटी वनवे याने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे कुठलाही क्लास न लावता स्वयंअध्ययन करत थेट मंत्रालयात सहाय्यक कक्ष
अधिकारी पदी सचिनची नेमणूक झाली आहे.
चोपनवाडी येथील व्यंकटी वनवे हे शेतकरी
आहेत. कोरडवाहू शेती जोपासताना नाकी नऊ येत असताना आपल्या तीन मुलांना कसे
शिकवायचे या विवंचनेत होते. पत्नी शांताने त्यांना साथ देत शेती सोबतच शिवणकाम काम
करत संसाराला पाठबळ दिले. हलाखीच्या परिस्थितीत सचिनचे इयत्ता चौथी पर्यंतचे
शिक्षण चोपनवाडी येथे झाले. परगावी शिक्षणासाठी जाण्यास खर्च झेपत नसल्याने आपल्या
मामाकडे वडवणी येथील महाराणी ताराबाई विद्यालयात सचिनने इयत्ता पाचवी ते नववी
पर्यंत शिक्षण घेतले. अभ्यासात चाणाक्ष व हुशार असलेल्या सचिनला मामांनी पुढे
अहमदपूर येथे शिक्षणासाठी पाठवले.
अहमदपूर येथे शिक्षण घेत असताना सचिनने
शिकवणी घेणे सुरु केले. यातून तो खर्च भागवू लागला. बीएससी पदवीनंतर त्याने
एमपीएससीचा अभ्यास सुरु केला. बीड येथील एका खोलीत तब्बल चार वर्ष अभ्यास करत
सचिनने एमपीएससी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न साकार केले. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात
झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होत सचिनची मंत्रालयातील सहाय्यक कक्ष
अधिकारी पदावर नेमणूक झाली आहे. ही वार्ता समजताच अक्षरशः गावाने सचिनला डोक्यावर
घेतले. डीजेच्या तालात अख्खे चोपनवाडी गाव थिरकलं. अख्खा गाव सचिनला खांद्यावर
घेऊन नाचू लागलेला पाहून सचिनची आई शांता व वडील व्यंकटी वनवे यांच्या डोळ्यात
आनंदाश्रू तराळले.
मातीचे ऋण फेडावे
मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न माझ्या
लेकाने पूर्ण केले आहे. भविष्यात गावासह पंचक्रोशीचा विकास माझ्या लेकाने करून या
मातीचे ऋण फेडावे.
- शांता व्यंकटी वनवे, आई
माझे अधुरे स्वप्न पूर्ण झाले
मी एमपीएससीची तयारी करायचो. मात्र
आजरापणामुळे स्पर्धा परीक्षेपासून मी दुरावलो. माझ्या मनातील अधुरे स्वप्न भावाने
पूर्ण केले आहे.
- विनोद वनवे, भाऊ
सर्वांच्या साथीने शक्य झाले
आईचे शिलाई काम तर वडिलांचे शेतातील
काबाडकष्ट समोर दिसत होते. यातून प्रेरणा घेत अभ्यास केला. आई-वडिलांचे स्वप्न
पूर्ण करणे हाच एकमेव ध्यास मनी बाळगला होता. सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो
याचा मनस्वी आनंद आहे. यादरम्यान मला माझे मार्गदर्शक जिज्ञासा अभ्यासिकेचे संचालक
अमोल धनवे, बहीण प्रियंका, भाऊ विनोद तसेच मित्र परिवार सदैव सोबत राहिले.