Type Here to Get Search Results !

एक व्हिडिओ कॉल आणि सेक्सटॉर्शनला बळी पडतेय तरुणाई,आयुष्याची वाट; 'हे' अख्खं गावच चालवतंय रॅकेट

 


मुंबई 25 नोव्हेंबर : सेक्सटॉर्शनला बळी पडलेल्या पुण्यातील एका 19 वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.

त्यानंतर सायबर गुन्ह्यातील ब्लॅकमेलिंगच्या या प्रकाराबद्दल बरचं काही बोललं जात आहे. राजस्थानातील एका गावातून हा सर्व खेळ चालत असल्याचा पर्दाफाश पुणे पेालिसांनी केला. इथं अख्खं गावच सेक्सटॉर्शनसारख्या गुन्ह्यात सक्रिय असल्याचं तपासातून समोर आलंय. सायबर गुन्हे करणारे लोक कशाप्रकारे तरुण, महिला व इतरांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढतात आणि नंतर ब्लेकमेलिंग करून पैसे उकळतात हे जाणून घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

'
आज तक हिंदी'नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. मागील काही दिवसांपासून सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढत चालले आहेत. हा शब्द अनेकांना कदाचित नवीन वाटू शकतो. पण आपल्या ओळखीतील एखादी व्यक्ती याला बळी पडू शकते.

पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात राजस्थानातील एका गावातून हा प्रकार कसा केला जातो याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सेक्सटॉर्शन म्हणजे काय हे जाणून घेण्याची आता गरज आहे. यात सायबर गुन्हेगार ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक सावजं शोधत असतात. त्यांना गोड बोलून जाळ्यातही ओढलं जातं.

बहुतांश वेळा पुरुषांना लक्ष्य करण्यासाठी महिलांचा वापर केला जातो अनेक प्रकरणांत तर व्हॉटस्अॅपवर अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल केला जातो आणि त्यांच्या जाळ्यात एखादी व्यक्ती अडकली की, आक्षेपार्ह स्थितीतील व्यक्तीचे व्हिडिओ तयार केले जातात. काहीवेळा तर युजरचा फोटो घेऊन मॉर्फ व्हिडिओ तयार केला जातो. त्यानंतर संबंधितांना ब्लॅकमेल केलं जातं.

ऑनलाइन फसवणूक करणारे भामटे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतात. समोरील व्यक्तीकडून पैसे उकळल्यानंतर हा प्रकार थांबत नाही तर वाढतच जातो, यालाच सेक्सटॉर्शन असं संबोधलं जातं. युवकाच्या आत्महत्येनंतर तपासाला आली गती सेक्सटॉर्शनला बळी पडलेल्या पुण्यातल्या एका 19 वर्षीय युवकाने आत्महत्या केली होती. आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी त्या युवकाला देण्यात आली होती.

त्यामुळे सुरूवातीला त्याने 4500 रुपये दिलेही होते. पण नंतर पैशांची मागणी करत ब्लॅकमेलिंग वाढत गेल्यानं या त्रासाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली. राजस्थानातील या गावातून चालतं रॅकेट या प्रकाराबद्दल बोलताना दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन म्हणाले की, राजस्थानातल्या अलवर जिल्ह्यातील गोथरी गुरू गावातून सेक्सटॉर्शनचं रॅकेट चालतं. ब्लॅकमेल करणारा आरोपी अनवर सुबान खान याला अटक करण्यात आली आहे.

सेक्सटॉर्शनचं रॅकेट तोच चालवत होता. या सर्वांमागील मास्टरमाइंड तोच आहे. या गावातील बहुतांश युवक व महिला सेक्सटॉर्शनशी जोडले गेले असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. सायबर पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान पुण्यात एकूण 1445 प्रकरणं समोर आली आहेत.

यात पीडितांना ब्लॅकमेल केलं गेलं किंवा त्यांचा छळ केला गेला. अशा प्रकरणात सायबर गुन्हेगार पुरूषांना लक्ष्य करण्यासाठी महिलांचा वापर करतात. गुन्हेगार शक्यतो इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सावज शोधत असतात. लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी आकर्षक डीपी लावला जातो.

अनोळखी व्हिडिओ कॉल्स आणि इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींशी चर्चा करताना आवश्यक ती सावधगिरी बाळण्याचा सल्ला सायबर पोलिसांनी दिला. सेक्सटॉर्शनला बळी पडल्यास काय करावं सेक्सटॉर्शनला बळी पडल्यानंतर अनेक लोक बदनामीच्या भीतीनं घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाशीही बोलत नाहीत. खूप कमी लोक पोलिसांत तक्रार देतात. सेक्सच्या मॉर्फ व्हिडिओत एखाद्या व्यक्तीचा चेहरा दिसतो तेव्हा ती व्यक्ती पैसे देऊन यातून आधी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.

याचवेळी भामटे समोरील व्यक्तीला त्रास द्यायला सुरूवात करतात. अनेक लोक तर घाबरून त्याचं सोशल मीडिया अकाउंट डीलिट करून टाकतात. याचाच फायदा भामट्यांकडून घेतला जातो. अशा प्रकारात फसवणूक होत असेल तर सर्वांत प्रथम संबंधित व्यक्तीने शांत राहणं गरजेचं आहे.

आवश्यक ती सतर्कता बाळगण्याची गरज आहे. अनोळखी व्हिडिओ कॉल्स व प्रोफाइलच्या आहारी न जाता काळजी घ्यायला हवी. तुमच्यासोबत एखादी घटना घडली असली तरी भामट्यांना पैसे बिलकुलही देऊ नका. तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून याची सर्व माहिती त्यांना द्यावी व ब्लॅकमेलिंग केल्या जाणाऱ्या नंबरला ब्लॉक करावे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies