बाळासाहेब तांबे, भिगवण
येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ऊर्फ बाळासाहेब गौतमचंद
रायसोनी (वय. ५५) यांचे रविवारी (ता.१३) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
दोन वर्षापुर्वी कोरोनांमुळे त्यांची
आरोग्यस्थिती खालावली होती. काही दिवसांपुर्वी त्यांच्यावर पुणे येथे शस्त्रक्रिया
करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यांची
आरोग्यस्थिती सुधारत असतानाच अचानक रविवारी (ता.१३) सायंकाळी हदयविकाराच्या
धक्क्याने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच भिगवण
परिसरावर शोककळा पसरली. भिगवण परिसरातील सच्चा विठ्ठलभक्त हरपला अशी भावना यावेळी
परिसरातून व्यक्त केली जात आहे.
रविंद्र रायसोनी किराणा मालाचे व्यापारी
होते. रविंद्र सेल्सच्या माध्यमातून त्यांनी प्रामाणिक व्यावसायिक अशी त्यांची
प्रतिमा भिगवण व परिसरामध्ये होती.
वारकरी संप्रदायाचा वारसा त्यांना
त्यांचे वडील गौतमचंद रायसोनी यांच्याकडून आल्याने पुढे १९८५- ९० दरम्यान
ह.भ.प.विठ्ठल महाराज घुले याचा सहवास लाभल्याने त्याचे विचाराने ते विठ्ठल भक्तीत
अधिक प्रभावित झाले. पुढे विठ्ठल भक्ताची सेवा करण्यासाठी त्यांनी वडील गौतमचंद
रायसोनी यांचे स्मृती प्रित्यर्थ गौतम स्मृती फांऊडेशनच्या माध्यमातून गुरुवर्य
वै. विठ्ठल महाराज घुले यांच्या स्मरणार्थ आजवर १२ पुण्यस्थिती सोहळा साजरा करत
यानिमित्ताने किर्तन महोत्सव व परिसरातील आठशे विठ्ठल भक्तांना चारधाम तीर्थ
यात्रा, पंढरपुर यात्रा आदी उपक्रम राबविले.
किर्तन महोत्सवाच्या माध्यमातून
महाराष्ट्रातील आघाडीच्या किर्तनकारांची अनेक किर्तने त्यांनी आयोजित केली. भिगवण
व परिसरांमध्ये विठ्ठलभक्त म्हणुन ते परिचित होते. त्यानी गेली अनेक वर्षे भिगवण
येथे काकड आरती सुरु केली. कोरोना काळांमध्ये त्यांनी अनेक गरजुंना त्यांनी
वैदयकिय मदत केली. त्यांनी शेवटच्या क्षणी विठ्ठल भक्तीच केली. संत तुकाराम
यांच्या अभंगवाणीतील “आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा” असे उद्गार काढतच
अखेर त्यांनी सखे सोयरे यांचा निरोप घेतला व प्राणज्योत मालवली.
त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवडे असा परिवार
आहे. येथील व्यावसायिक आनंद रायसोनी व प्रफुल्ल रायसोनी हे त्यांचे पुत्र तर एक
मुलगी, सुना, नातवडे असा परिवार आहे. उमाकांत रायसोनी हे त्यांचे बंधु होत. सोमवार
सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यासाठी रथयात्रेतून त्यांना
गावातील मुख्य चौकातून टाळ मृदुंग वाजवत हरिनामाचे गजर करत त्यांच्यावर भिगवण
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय
उपस्थित होता.