मुंबईत 'अथांग' या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
"हल्ली
बायोपिकचं भयंकर पेव फुटलं आहे. मी जी आजपर्यंत पाहिलेली बेस्ट बायोपिक आहे ती
म्हणजे अॅटबरो यांची 'गांधी' ही आहे. भारतात जर समजा पुन्हा कुणावर बायोपिक करायचा झाला तर
त्यासाठी एकमेव व्यक्तीमत्व ते म्हणजे इंदिरा गांधी या आहेत. आयुष्यात जी रोलर
कोस्टर राईड आपण ज्याला म्हणतो तसे बरेच उतार-चढाव इंदिरा गांधी यांच्या आयुष्यात
आहेत. ते मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल. त्यामुळे त्यांच्या आयुष्यावरचा सिनेमा
खूप इंटरेस्टिंग होऊ शकतो. एखादा माणूस मला आवडला म्हणून त्यावर बायोपिक होऊ शकत
नाही. व्यक्तीची निवड खूप महत्वाची असते", असं राज ठाकरे म्हणाले.
माझ्या बायोपिकआधी मला...
अभिनेत्री तेजस्वीनी पंडित हिनं
यावेळी राज ठाकरे यांना तुमच्या आयुष्यावर बायोपिक काढायचा झाला तर तुम्हाला
कोणत्या अभिनेत्याला काम करताना पाहायला आवडेल असा प्रश्न विचारला. त्यावर राज
ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिलं. "मला घरी जाऊन आधी बायकोपिकला विचारावं
लागेल", असं राज ठाकरे म्हणताच सभागृहात एकच हशा
पिकला. "मी कसा दिसतो हे मला तसं माहीत नाही. फक्त आरसा सोडला तर. त्यामुळे
ती गोष्ट कोण करू शकेल याची मला कल्पना नाही. काही असेल तर बायोपिक करा. काही नसेल
तर उगाच बायोपिकची गरज नाही", असं राज
ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवरायांवर तीन भागात सिनेमा
"राजकारण आणि चित्रपट या दोन
मोठ्या गोष्टी आहेत. दोन दगडांवर पाय ठेवून चालणं सोपं नाही. आपल्या देशातली अडचणी
अशी आहे की निवडणूक हा एक धंदा आहे. निवडणुका संपतच नाहीत. एक झाली की दुसरी अशा
सुरूच असतात. त्यामुळे दिग्दर्शन विषयाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला तर नक्कीच काम
करेन. माझ्या डोक्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करण्याचा विचार आहे.
पण आताच इतके सिनेमे महाराजांवर येऊन गेलेत की आता लगेच त्याला हात लावण्यास माझी
हिंमत होत नाही", असं राज
ठाकरे म्हणाले.