पायात धारदार हत्यारे लावत कोंबड्या झुंजवणाऱ्या ३४ जणांना अटक; तब्बल ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
मुंबई - दि.७
खोपोलीतील तेज फार्महाऊसमध्ये फायटर कोंबड्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या ३४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून ७६ फायटर कोंबड्या, मोठ्या प्रमाणात दारू, २४ वाहनांसह ७१ लाख ७८ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात प्राण्यांना निर्दयतेने वागवणे, जुगार कायदा आणि दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री तेज फार्महाऊसवर कोंबड्यांच्या झुंजी लावत मोठा जुगार सुरू होता. कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळण्यासाठी खास आणि शौकीन लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मुबलक प्रमाणात दारू मांसमटणाची मजा घेत, हे जुगारी फायटर कोंबड्या झुंजवत होते. विशेष म्हणजे बाहेरून मागवलेल्या या विशिष्ठ फायटर कोंबड्यांच्या पायात धारदार हत्यारं लावली होती. जेणेकरून त्या एकमेकांवर प्राणघातक आणि जबरी वार करू शकतील. या सगळ्या प्रकाराची सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळताच रायगड-अलिबागचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार खोपोली पोलिसांनी गगनगिरीनगर खोपोली येथील फार्महाऊसवर छापा टाकत कारवाई केली आहे. सदर कारवाईमध्ये आरोपींकडून ४ लाख ३१ हजार १९५ रुपये रोख. १८ हजार ७०० रुपयांची अवैध दारु, ६६ लाख ९० हजार किंमतीची २५ वाहने ७६ फायटर कोंबडया असा एकूण ७१ लाख 7७८हजार १९५ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून खोपीली पोलीस पुढील तपास करत आहेत.