अजय देवगण, तबू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशीता दत्ता, मृणाल जाधव, रजत कपूर, सौरभ शुक्ला, नेहा जोशी, कमलेश सावंत, योगेश सोमण, शरद भुताडीया
निर्माता :
भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार
शैली :
क्राईम थ्रीलर
कालावधी :
दोन तास २० मिनिटे
दर्जा : चार
स्टार
चित्रपट
परीक्षण: संजय घावरे
शब्दांवर
विश्वास ठेवू नका. कारण शब्द मनात भ्रम निर्माण करतात, पण दृश्य कधीच खोटं बालत नाहीत, ते सत्य दाखवतात अशा आशयाचा संवाद या चित्रपटात आहे. पटकथा, संवाद आणि मांडणीच्या आधारे हे पटवून दिलं आहे. सर्व
चित्रपटांमध्ये सत्याचा विजय आणि असत्याचा पराजय होतो, पण यात अगदी उलट घडूनही पाहणाऱ्याला त्यात काही वावगं वाटत
नाही. हीच खरी दृश्यमची जादू आहे. सात वर्षांनी 'दृश्यम'चा दुसरा
भाग पाहताना निशिकांत कामतची आठवण येते. निशी असता तरी त्यानंही असाच काहीसा
चित्रपट बनवला असता. अभिषेक पाठकनं निशीचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे.
कथानक :
विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची हि कथा आहे. ४ ऑक्टोबर २०१४ च्या रात्री
घडलेल्या घटनेतील दुसरा ट्रॅक ओपन करत चित्रपटात रंगत आणली आहे. केबल चालवणाऱ्या
विजयनं प्रगती केली आहे. घरासमोरील जमिन विकून थिएटर उभारलं आहे. तो चित्रपटाची
निर्मितीही करत आहे. त्याची कथा त्यानं पुस्तक रूपात प्रकाशित केली आहे. सॅमची
बाॅडी न मिळाल्यानं पोलिसांचं शोधकार्य सुरूच आहे. पोलीस कधीही पुन्हा येऊ शकतात
हे माहित असल्यानं विजयही गाफील नाही. विजयच्या घरासमोर राहणाऱ्या जेनीला तिचा
दारुडा नवरा बेदम मारहाण करत असतो. जेनीला नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार करायला
विजय सांगतो आणि दुसऱ्या भागात पहिल्यांदा त्याची पोलिसांशी गाठ पडते. त्यानंतर जे
घडतं ते पाहण्याजोगं आहे.
लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची कथाच हिरो असून कथानकाच्या
तालावर नाचणाऱ्या कॅरेक्टर्सनी चोख कामगिरी बजावली आहे. पटकथेची मांडणी अत्यंत
प्रभावी आहे. चित्रपट अखेरच्या दृश्यापर्यंत खिळवून ठेवतो. ठराविक अंतरानं नवा
ट्विस्ट आणतो. संवाद खूप मार्मिक आहेत. त्यामुळं दृश्यांसोबतच संवादांकडेही लक्ष
द्यावं लागतं. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबाला अडचणीत आणू न देण्यासाठी सत्य
लपवणारा नायक आणि सत्याचा मागोवा घेताना खलनायक वाटणारे पोलीस ही या चित्रपटाची
सर्वात मोठी खासियत आहे. मध्यंतरापूर्वीचा भाग पटकथेचा विस्तार करण्यात जातो.
त्यात थोड्या संकलनातील त्रुटी जाणवतात. मध्यंतरानंतर मात्र चित्रपट हलण्याचीही
संधी देत नाही. अटकेनंतरचा बॅकअप प्लॅन तयार करणारा विजय घरी रेकॉर्डिंग डिव्हाईस
लावेपर्यंत गाफील राहतो हे पटत नाही. त्या डिव्हाईसेसचं पुढे काय होतं हेही स्पष्ट
होत नाही. सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, कला दिग्दर्शन, गीत-संगीत
सर्वच बाबतीत चित्रपट उजवा आहे. क्लायमॅक्समधील खटल्याचा भागही थोडक्यात आटोपता
घेण्यात आल्यानं फाफटपसारा वाढला नाही.