Type Here to Get Search Results !

रणशिंग फुंकले; खोके सरकारला घेरणार! महाविकास आघाडीच्या बैठकीत अ‍ॅक्शन प्लान ठरला


 विदर्भात अवकाळी पाऊस, कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱयांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्यांना भेडसावणारे महागाई, बेरोजगारी आणि शेतीच्या प्रश्नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ईडी सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नागपूर येथे 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधान भवनातील कार्यालयात झाली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, एकनाथराव खडसे, हसन मुश्रीफ, अनिल परब, सुनील प्रभू, अजय चौधरी, शशिकांत शिंदे, भाई जगताप, सचिन अहिर, सुरेश वरपूडकर, अमिन पटेल, अनिल पाटील, बाळाराम पाटील, अबू आझमी, कपिल पाटील, रईस शेख असे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.

एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी महाराष्ट्र मागे चाललाय - आदित्य ठाकरे

शेतकऱयांना न मिळालेली मदत, पीक विमा यावर आज चर्चा झाली. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार काम न करता नुसत्या घोषणा करीत आहे. महाराष्ट्राच्या डोळय़ासमोर हे सर्व घडत आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी महाराष्ट्र मागे चालला आहे याचे अधिक दुःख आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर दिली.

किमान तीन आठवडय़ांचे अधिवेशन हवेच!

या अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, शेतकऱयांच्या विषयांसोबतच विदर्भाचे अनेक प्रश्न अधिवेशनात मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे असा विरोधकांचा आग्रह आहे, मात्र सरकारने हिवाळी अधिवेशनसाठी दोन आठवडय़ांचा कालावधी प्रस्तावित केला असून तो आम्हाला मान्य नाही. हे अधिवेशन किमान तीन आठवडे चालले पाहिजे अशी आमची मागणी आहे.

विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या येत्या 5 डिसेंबरला होणाऱया बैठकीत अधिवेशनाच्या वाढीव कालावधीचा विषय लावून धरणार आहोत. तसेच आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आणि संघटितपणे सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवू, असे अजित पवार म्हणाले.

वाचाळवीरांना आवरा, नाही तर निवडणुकीत काय ते कळेल, अजित पवार यांचा इशारा

राज्यातल्या या वाचाळवीरांना आवरा, त्यांच्यात चुका करण्याची स्पर्धाच लागली आहे. हे सर्व राज्यातील जनता बघत आहे. एकदा निवडणुका लागू द्या. मग त्यांना काय ते कळेल, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ईडी सरकारमधील वादग्रस्त वक्तव्य करणाऱयांचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies