पुणे, दि. 16 -ज्येष्ठ रंगकर्मी आणि नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने हिराबाग येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये नाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. लागू यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. आनंद यांनी बुधवारी केली.
महाराष्ट्र
कल्चरल सेंटर आणि डॉ. लागू यांचे घनिष्ट सबंध होते. त्यांचे स्मारक व्हावे, असा मानस सेंटरतर्फे लागू कुटुंबीयांकडे व्यक्त करण्यात आला.
याला डॉ. लागूंचे नाव देण्यालाही लागू कुटुंबीयांनी परवानगी दिली. एवढेच नव्हे, तर 60 लाख
रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचेही कबूल केले. “तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ सोहळ्यात
त्यांनी त्यातील 10 लाख
रुपयांचा धनादेश सेंटरचे अध्यक्ष आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्याकडे सुपूर्त
केला.
डॉ. लागू
यांच्या नावाने 250
ते 300 आसन क्षमता असणारे नाट्यगृह उभे राहणार आहे. त्यात अद्ययावत
सुविधा असणार आहेत. कलाकारांना त्यांच्या अभिव्यक्तीच्या गरजेनुसार संपूर्ण रंगमंच
हव्या त्या पद्धतीने नाट्यप्रयोगासाठी वापरता येणार आहे, किंबहुना तशीच सोय या नाट्यगृहात करण्यात येणार आहे. तसेच डॉ.
लागूंच्या पारितोषिकांचे, पुस्तकांचे, भाषणांचे तसेच त्यांनी बसवलेल्या नाटकांच्या संहिता या
सगळ्याचे संग्रहालय याच वास्तूत उभे केले जाणार असल्याचे डॉ. आनंद यांनी नमूद
केले.
यंदापासून
डॉ. लागू यांच्या जन्मदिनी म्हणजेच 16 नोव्हेंबर
रोजी “तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. तसेच हा पुरस्कार “रूपवेध प्रतिष्ठान’ आणि “महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ यांच्या
संयुक्त विद्यमाने देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.