Type Here to Get Search Results !

मावळ लोकसभेसाठी शिवसेना ॲक्शन मोडमध्ये' ! आगामी निवडणुकीत खासदार बारणेंना तगडे आव्हान

 


पिंपरी, - मावळ लोकसभेच्या निर्मितीपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे गेला आहे.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेऊन शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या मतदारसंघाची पुर्नबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ मिळवत या मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकाविण्यासाठी शिवसेनेकडून सुरू झालेल्या तयारीमुळे श्रीरंग बारणे यांच्यासमोर तगडे आव्हान उभारणार हे निश्‍चित मानले जात आहे.

सन 2009 साली झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत खडतर असलेल्या मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ हे घाटावरील तर पनवेल, कर्जत आणि उरण हे घाटाखालील विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. गजानन बाबर यांच्या रुपाने मावळवर शिवसेनेने पहिल्यांदा भगवा फडकाविला होता. तर त्यानंतर शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना सलग दोनवेळा संधी दिली आहे. दोन्हीवेळा मोठ्या फरकाने बारणे यांनी विजय मिळविला होता. सन 2019 साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव केला होता.

शिवसेनेसाठी नेहमीच साथ देणाऱ्या मतदारसंघात शिवसेनेतील फुटीमुळे मोठी उलथापालथ घडली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत बारणे यांनी थेट शिंदे यांची साथ दिल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. बारणे हे शिंदे गटात गेले तरी त्यांच्यासोबत शिवसेनेचे महत्त्वाचे नेते न गेल्यामुळे मतदारसंघातील पक्षावर म्हणावा तितका फरक पडलेला नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत आता शिवसेनेने या ठिकाणी पुर्नबांधणी सुरू करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत घुले यांच्या माध्यमातून बारणे यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

अनिकेत घुले हे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. अगोदर मनसे आणि नंतर शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. बारणेंपाठोपाठ अनिकेत घुले यांना देखील शिंदे गटात जाण्यासाठी संधी होती. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचे ठरविल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. अनिकेत घुले यांची ओळख शिवसैनिक अशी आहेच, याशिवाय ते शिवभक्त म्हणूनही ओळखले जातात. तसेच आक्रमक वक्तृत्वामुळे तरुण वर्गात लोकप्रिय आहेत. युवा वर्गात घुले यांची असलेली क्रेझ, त्यांची वक्तृत्वशैली, संघटन कौशल्य, राजकीय ठाम भूमिका अशा गुणांमुळे एकेकाळी श्रीरंग बारणे यांचे खंदे समर्थक म्हणून मावळात ओळखले जाणारे घुले आता मावळमध्ये बारणेंना मोठी टक्कर देऊ शकतात, अशी देखील चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

वेदांतवरून बारणे टार्गेट
वेदांत फॉक्‍सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. तो प्रकल्प मावळ मधील तळेगाव येथे होणार होता. प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांनी तळेगावात आंदोलन केलं. आंदोलनासाठी अनिकेत घुले यांनी जमवलेली गर्दी बारणे गटाला नक्कीच घाम फोडणारी होती. श्रीरंग बारणे हे शिंदे गटात असले तरी ते भविष्यात भाजपच्याच तिकीटावर उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता असल्याने गुजरातला गेलेल्या वेदांवरून सध्या मावळ तालुक्‍यात श्रीरंग बारणे यांनाच टार्गेट केले जात आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याच्या अपयशाचे धनी बारणे यांनाच ठरविले जाण्याचीही शक्‍यता आहे.

भाजपातून बारणेयांना विरोध?
श्रीरंग बारणे हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते. त्यांनी आपला राजकीय प्रवास कॉंग्रेस, शिवसेना ते शिंदे गट असा केला असला तरी 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपमध्येच जाण्याची अधिक शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपमधील इच्छुक आणि बारणे विरोधक एकत्र येऊन बारणे यांना धक्का देण्याची शक्‍यता अधिक आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी बारणे यांचे राजकीय वैर सर्वपरिचित आहे. तर मावळचे माजी आमदार बाळा भेगडे हे भाजपच्या तिकीटावर मावळातून लोकसभेत जाण्यासाठी तयारी करत होते. मात्र राजकीय घडामोडींमुळे त्यांनी सध्या आपल्या कार्यक्रमांना ब्रेकलावला असला तरी आयत्यावेळी जगताप आणि भेगडे हे काय निर्णय घेणार यावर मावळ लोकसभेचे गणित अवलंबून असणार आहे.

राष्ट्रवादीही काढणार उट्टे
सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता. हा पराभव अद्यापही अजित पवार हे विसरू शकलेले नाहीत. शिवसेना राष्ट्रवादीसोबत आणि बारणे शिवसेनेतून बाहेर गेल्याने गत निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याची राष्ट्रवादीला आयती संधी मिळणार आहे. राष्ट्रवादी आपला उमेदवार रिंगणार उतरविणार की नाही हे अद्याप निश्‍चित नसले तरी बारणे यांच्या विरोधात आपली ताकद लावून बारणे यांना घरी बसविण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोठा प्रयत्न होणार हे मात्र निश्‍चित आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies