तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? महाराष्ट्र तुम्हाला असा-तसा वाटला का, असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे.
केंद्राने
यामध्ये तत्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला. प्रत्येक राज्याचा
अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंध ठेवण्याचे काम केले
आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत त्यामुळे
महाराष्ट्र सरकारने यावर अधिकृतपणे आपली भूमिका मांडली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. महागाई, बेरोजगारीवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात
आहेत, असेही पवार म्हणाले.
महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतलीय का?
शिंदे-फडणवीस
सरकारने आधी राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प भाजपशासित गुजरात व मध्य प्रदेशच्या
घशात घातले व आता कर्नाटकने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे हे महाराष्ट्राची
चोहोबाजूनी गळचेपी करणारे आहे, असे
सांगताना शिंदे- फडणवीस सरकारने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
नाना पटोले यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत
मोठा अडथळा आणणारे आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या शिंदे-फडणवीसांना सरकार
चालवता येत नसून त्यांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे, असेही पटोले म्हणाले.