Type Here to Get Search Results !

धक्कादायक! मुकादमाच्या निर्दयीपणामुळं तीन दिवसाच्या बाळाला मृत्यूनं कवटाळलं; आईनं बाळाला पाहून हंबरडा फोडला


 साचा गोडवा जेवढा त्याहीपेक्षा वेदनादायी आयुष्य ऊसतोड कामगारांचं असतं. ऊस तोडीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर परिसरात आलेल्या दाम्पत्याला तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला दवाखान्यात जाण्यासाठी मुकादमानं सुट्टी दिली नाही.

अन् त्या गोंडस बाळाला उपचाराअभावी मृत्यूनं कवटाळलं. निर्दयीपणे 'तुझ्या मुलाच काही झालं तरी चालेल; पण ऊस तोडीचं काम केलंच पाहिजे, असं धमकावलं, अशी तक्रार मयत बाळाचे वडील सुनील पवार यांनी केली.

ऊस तोडीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून आलेल्या महिलेला सोमवारी सकाळी प्रसूती वेदना होऊ लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना रस्त्यातच मीरा पवार यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

यामुळे मुकादमानं महिलेची प्रसूती रस्त्यात झाल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये कशाला नेता, असे म्हणत पुन्हा कामाच्या ठिकाणी घेऊन गेले.

त्यानंतर दोनच दिवसांनी नवजात बाळ दूध पित नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी सुट्टी मागितली. मात्र मुकादमानं दवाखान्यात जायचं नाही. ऊस तोड महत्त्वाची आहे, असं सुनावलं.

पण बाळाची तब्येत जास्त खराब झाल्याने सुनील पवार यांनी पत्नी मीरा व बाळाला घेऊन जवळच्या
खासगी हॉस्पिटलमध्ये नंतर मंगळवेढा येथील सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले.

त्यानंतर त्या बाळाला बुधवारी सायंकाळी शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मुकादमाच्या पाया पडलो, पण उलट मलाच मारहाण केली

बाळाला दवाखान्यात दाखवण्यासाठी मुकादमाच्या पाया पडलो, पण उलट त्यांनी मलाच मारहाण केली. तुझ्या मुलाचं काहीही झालं तर चालेल; पण माझं काम थांबू नये, असे म्हणत धमकावले. आज माझं बाळ दगावलं याला कोण जबाबदार. -सुनील पवार मृत बाळाचे वडील

आईनं बाळाला पाहून हंबरडा फोडला

आपल्या मुलाचा मृतदेह गावी नेण्यासाठीही बाळाच्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते. यामुळे सकाळी शवविच्छेदन होऊनही पैशांची जमवाजमव करत दुपारी दोनपर्यंत त्यांना वाट पाहावी लागली.

जेव्हा मुलाला हातात घेतलं, निपचित डोळे झापलेल्या गोऱ्यापान मुलाला पाहून आईने हंबरडा फोडला. हे दृश्य पाहून उपस्थितांनाही गलबलून आलं.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies