Type Here to Get Search Results !

दिग्गज टेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ, पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा नोकरकपात; यामागचं नेमकं कारण काय?

  


गेल्या काही आठवड्यांपासून दिग्गज टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात आलं आहे.

वॉल स्ट्रिटच्या अहवालानुसार, पुढील काही आठवड्यांमध्ये आणखी टेक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहवालानुसार, पुन्हा एकदा मेटा कंपनी लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. याआधी फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं होतं. अर्थतज्ज्ञांच्या मते, सध्या नोकरकपातीचा हंगाम सुरु झाला आहे, असं म्हणावं लागेल.

नोकरकपात ही आर्थिक परिस्थिती आणि पुढील वर्षाचे बजेट आणि नियोजन यासह अनेक घटकांवर आधारित असते. लिफ्ट ट्रान्सपोर्ट कंपनीनेही 700 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. दिग्गज टेक कंपनी फिनटेकनेही 14 टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला. या फक्त गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या नोकरकपात आहेत असून ही फक्त सुरुवात आहे, असं काही अर्थतज्ज्ञांचं मत आहे. येत्या काही आठवड्यामध्ये आणखी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतील.

टेक कंपन्या येत्या वर्षासाठी आर्थिक नियोजन आणि योजना आखू लागल्या आहेत. मात्र या काळात कंपनीला होणारा फायदा कमी होताना दिसत आहे. अनेक आर्थिक तज्ज्ञांनी, ही आर्थिक मंदी चाहूल असल्याचा अंदाजही वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर टेक कंपन्या आपला व्यवसाय, त्यासाठीचा खर्च आणि होणारा नफा याचं नियोजन करत आहेत. त्यामुळे दिग्गज कंपन्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करुन आपला खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. नोकरकपात केल्याने कंपनीचा पगाराचा खर्च कमी होईल.

एकीकडे जागतिक मंदी येण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यातच गेल्या वर्षभरात दिग्गज टेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. बिग टेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये कमी कमाईची नोंद केली आहे, त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या भविष्याची चिंता भासू लागली आहे. वाढता खर्च आणि घटता नफा हे पाहता कंपन्यांनी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात करण्यात येत आहे.

कोलंबिया बिझनेस स्कूलचे प्राध्यापक डॅन वांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कंपन्या खर्च कमी करण्याचा विचार करतात, तेव्हा सर्वात पहिल्यांदा कामगार खर्चात कपात केली जाते. त्यानंतर जाहिरात आणि त्यानंतर मार्केटिंग या खर्चात कपात केली जाते. त्यामुळे कंपन्या खर्च कमी करण्यासाठी सर्वात आधी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करतात.

मागील दोन वर्षामध्ये कोरोना साथीच्या रोगामुळेही अनेक कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. आता जरी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे, असं दिसत असलं तरी कंपन्यांना नफ्याहून अधिक तोट्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी टेक कंपन्यांपुढे कर्मचाऱ्यांना हटवण्याचाच पर्याय आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies