सरकारवर सातत्याने होणारे आरोप, मंत्र्यांकडून होणारी वादग्रस्त विधाने, शेतकरी आणि बेरोजगारांची नाराजी यामुळे की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भवितव्याची चिंता वाटू लागली आहे.
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीत पोहोचून सपत्नीक साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली.
साईंच्या समाधीसमोर ते नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण
विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
हेसुद्धा होते. शिर्डीत दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा नियोजित कार्यक्रम हा
मुंबईत परतण्याचा होता, पण त्यांनी
आपला ताफा अचानकपणे नाशिक जिह्यातील सिन्नर तालुक्यातील मीरगावच्या दिशेने रवाना
केला. अचानक बदललेल्या या दौऱयामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
मीरगाव
शिवारात एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. तेथील महादेवाच्या मंदिरात शिंदे यांनी दर्शन
घेतले. तिथेच हे ज्योतिषी बसतात. शिंदे यांनी त्यांना आपला आणि पत्नीचाही हात
दाखवून भविष्य जाणून घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
चांदीच्या अंगठीत तर्जनीत गोमेद धारण करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना
उजव्या हाताच्या तर्जनीत चांदीच्या अंगठीत गोमेद रत्न धारण करण्याचा सल्ला मीरगावच्या
ज्योतिषी बाबांनी दिल्याची माहिती शिंदे यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली. गोमेद
हे राहूचे रत्न असून राजकारणातील विरोधकांच्या नजरबंदीसाठी प्रभावी ठरेल असे
ज्योतिषाने शिंदे यांना सांगितल्याचेही कळते.