लाखो भाविक आळंदीच्या वाटेवर : संत नामदेव महाराजांच्या पालखीचे आगमन
आळंदी- ज्ञानेश्वर फड
आळंदी हे गाव
दैवताचे नाव सिद्धेश्वर ।्।
चौऱ्यांशी सिद्धांचा
सिद्धबेटी मेळा।
तो सुख सोहळा काय वर्णू ।्।
विमानांची दाटी
पुष्पांचा वर्षाव।
स्वर्गाहुनी देव करिताती ।।
नामा म्हणे देवा
चला तया ठाया।
विश्रांती घ्यावया कल्पवरी ।।
संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रेला गुरुवार
(दि. 17) पासून सुरुवात होणार आहे. सकाळी 7 वाजता श्रीगुरू हैबतबाब यांच्या पायरी पूजनाने सोहळ्याची
सुरुवात होईल. तत्पूर्वी अलंकापुरीत आता भाविक जमण्यास सुरुवात झाली आहे. हजारो
भाविक अलंकापुरीत दाखल झाले असून लाखो भाविक आळंदीच्या वाटेवर आहेत.
संतांची
पालखी सोहळेदेखील आता अलंकापुरीत दाखल होत आहेत. संत नामदेव महाराज यांच्या
पालखीचे बुधवारी (दि. 16) सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान हरिनाम गजरात भक्तीमय वातावरणात
अलंकापुरीत आगमन झाले. तर गुरुवारी (दि. 17) श्री
पांडुरंगराच्या दिंडीचे आळंदीत आगमन होणार आहे. अलंकापुरीत सर्वत्र आता हरिनाम
सप्ताहास सुरुवात होत असून चोहीकडे टाळ, मृदंगाचा
आवाज घुमत आहे. प्रत्येकाच्या मुखात माऊली… माऊली…शब्द ऐकायला मिळत आहे. यात्रेसाठी आलेले भाविकांची गर्दी आता
हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. सर्व रस्त्यांवर विविध वस्तूंची दुकाने उभारली जात
आहेत. मंदिरात माऊलींच्या दर्शनाची रांग आता हळूहळू वाढत आहे. यात्रेनिमित्त सुरू
असलेली प्रशासनाची तयारीही आता पूर्णत्वास येत आहे.
महाद्वारात दिंड्यांची हजेरी
राज्यातील विविध भागातून वारकरी
भाविकांच्या दिंड्या आळंदीत दाखल होत आहेत. आळंदीची नगरप्रदक्षिण करून दिंड्या
महाद्वारात हजेरी लावत असल्याचेही दिसत आहे. त्यानंतर आपल्या नियोजित ठिकाणी जाऊन
भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू आहेत.
माऊलींची
नवीन मुखप्रतिमा विराजमान
भाविकांना यावर्षी माऊलींचे नवे
साजिरे रूप संजीवन समाधीवर पाहायला मिळणार आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथील
शिल्पशास्त्रज्ञांकडून बनविण्यात आलेला चांदीचा मुखवटा अर्पण करण्यात आला. यावेळी
सहस्त्र जलकुंभाचे पूजन करून त्या जलकुंभातील पाण्याने नवीन मुखप्रतिमेला जलाभिषेक
करण्यात आला. यावेळी प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विस्वस्त ऍड. विकास ढगे पाटील, चैतन्य
महाराज कबीरबुवा,
डी. डी. भोसले पाटील, योगीराज कुऱ्हाडे, योगेश आरू, प्रफुल्ल प्रसादे, निखील
प्रसादे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांसह भाविक
उपस्थित होते.
आज माऊली मंदिरात होणारे कार्यक्रम
माऊली मंदिरात कार्तिक वद्य
अष्टमी गुरूवारी (दि. 17) पहाटे 3 ते 5 यावेळेत
पवमान अभिषेक व दुधारती होईल. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा होतील. सकाळी 7 ते 9 वेळेत ह.भ.प.
भाळासाहेब पवार आणि हैबतबाबा वंशजांच्या वतीने श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरीची
पूजा होईल. दुपारी 12.30 ते
महानैवेद्य. सायंकाळी 6.30 ते 8 योगिराज ठाकूर यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन होईल. नंतर 9 ते 11 बाबासाहेब
आजरेकर यांच्यावतीने कीर्तन होईल. रात्री 9 ते 12 श्रींची मंदिरात पालखी प्रदक्षिणा होईल. रात्री 12 ते 12.30 धुपारती. 10 ते 12 वासकर
महाराज यांच्या वतीने हैबतबाबांच्या पायरीपुढे जागर. 12 ते 2 मारुतीबुवा
कराडकर यांच्या वतीने जागर. 2 ते 4 हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने जागर.