Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात सुषमा अंधारेंची जाहीर सभा, अन् मुस्लिम बांधवांनी दाखवला मनाचा मोठेपणा; सर्वत्र चर्चेचा विषय

 


कुरुंदवाड : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची काल, मंगळवारी कोल्हापुरात जाहीर सभा झाली.

यासभेत अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह, कोल्हापूरचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. यासभेदरम्यान मुस्लिम बांधवांनी दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाची मात्र सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

कुरुंदवाड येथील थिएटर चौकात सुषमा अंधारेंची सभा होती. सभा असलेल्या चौकात मशिद आहे. दररोज आठ वाजता नमाज पठण होते. सभा सुरू असल्याने ध्वनिक्षेपकावरील नमाज पठणाने सभेत अडथळा नको हे समजून मुस्लिम समाज बांधवांनी ध्वनिक्षेपक बंद ठेवून नमाज पठण केले. मुस्लिम बांधवांचा मनाचा मोठेपणा व सामंजस्यपणा शहरात चर्चेचा विषय होता.

या सभेत बोलताना अंधारे म्हणाल्या, खासदार धैर्यशील माने लोकसभा निवडणूकीपूर्वी अडगळीत पडले होते. निवेदिता माने यांचे शिवसेनेशी विश्वासघातकी राजकारण विसरुन मातोश्री'ने धैर्यशील मानेना लोकसभेची उमेदवारी दिली. शिवसैनिकांनी त्यांना कष्टाने निवडून आणले. मात्र त्यांनीही शिवसेनेशी गद्दारी केली असून माने घराण्याला शिवसैनिक अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत अशी खरमरीत टीका केली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी धैर्यशील माने पंचगंगा नदीतील जलपर्णी हातात घेऊन नदी प्रदुषण विरोधी आंदोलनाचा आव आणत होते. खासदार झाल्यानंतर त्यांना नदी प्रदूषण दिसले नाही काय असा सवाल करत स्वार्थी राजकारण करणाऱ्या माने घराण्याला शिवसैनिक अद्दल घडविल्यशिवाय स्वस्त बसणार नाहीत असा इशारा अंधारे यांनी दिला.

यावेळी शिवसेना उपनेत्या संजना घाळी, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, यांची भाषणे झाली. यावेळी संपर्क प्रमुख मधुकर पाटील, शहर प्रमुख बाबासो सावगावे, राजू आवळे, आण्णासो बिल्लोरे, वैशाली जुगळे, संजय अनुसे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गद्दारांना खाली खेचा

सभेत सुषमा अंधारे यांनी, खासदार धैर्यशील माने यांच्याबरोबर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावरही सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, रत्नाप्पा कुंभार यांच्या आशिर्वादाने सहकार आणि राजकाणात येवून यड्रावकरांनी त्यांच्याशीच गद्दारी केली होती. तीच गद्दारी पुन्हा राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेशी केली आहे. या गद्दारांना खाली खेचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे असे आवाहन सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना केले.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies