चालत्या टॅक्सीत महिलेने दिला बाळाला जन्म, चालकाने आकारले एवढे बील
एका महिलेने चालत्या टॅक्सीमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. मात्र अशातच कॅब कंपनीने भाड्याबरोबरच सफाईच्या नावाने जास्त पैशांची मागणी केली आहे. 20 किलोमीटरहून कमीच्या प्रवासासाठी कंपनीने 8 हजार 568 रुपयांचे बिल दिले होते.
याबाबत महिलेने स्वत: तिची स्टोरी शेअर केली आहे.
ब्रिटनमध्ये राहणारी 26 वर्षांची फराह कॅकेनडिन नियमित तपासणीसाठी टॅक्सीतून रुग्णालयात जात होती. तेव्हा अचानक रस्त्यात तिला प्रसूती कळा सुरु झाल्या. काही वेळातच फराहने चालत्या टॅक्सीत बाळाला जन्म दिला. याआधीच रुग्णवाहिकेसाठी फोन करण्यात आला होता. मात्र रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकली नाही. ज्यामुळे प्रसूतीनंतर फराह स्वत: कॅबमधून रुग्णालयात पोहोचली. तिथे रुग्णालयाच्या गेटवर असलेल्या परिचारिकांनी तिला आत घेत तत्काळ तिच्यावर उपचार सुरु केले. फराहने नवजात बाळाला जॅकेटमध्ये लपेटून आणले होते.
काही दिवसानंतर फराहला अॅरो टॅक्सी कंपनीचे ट्रॅव्हल बिल मिळाले. ते पाहून ती थोडी गोंधळली. 20 किलोमीटरहून कमीच्या प्रवासासाठीही 8 हजार 568 रुपयांचे बिल दिले होते. यामधील 5 हजार 713 रुपये सफाई चार्ज देण्यात आला होता कारण तिने गाडीत बाळाला जन्म दिला होता. द सनच्या वृत्तानुसार, या घटनेसंदर्भात फराह सांगते की, हे सगळं एवढ्या घाईत झाले की, मला त्यावेळी काहीच सुचले नाही. सोबतच तिने सांगितले की, मी समजू शकते मात्र अशा अवस्थेत कॅब कंपनीचे एवढे पैसे आकारणे थोडे खटकले आहे.