कसारा : राड्याचापाडा येथील मंगेश माेरे हा साेमवारी संध्याकाळी शेतात काम करत हाेता. त्याच्यावर बिबट्याने मागून अचानक हल्ला केला.
वरई, नागलीचे भारे बांधण्यासाठी मंगेश हा शेतालगत वेली ताेडत हाेता.
तेथेच बिबट्या लपून बसला हाेता. मंगेश बेसावध असताना या बिबट्याने त्याच्यावर
हल्ला चढवला. त्याच्या पाठीवर पंजा मारून त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत
असतानाच भांबावलेल्या मंगेशने स्वत:ला सावरले आणि प्रसंगावधान राखून त्याने
हातातील काठीने बिबट्यावर हल्ला केला. काठीचा फटका ताेंडावर लागताच भयभीत झालेल्या
बिबट्याने धूम ठाेकली. त्यानंतर मंगेशने घरी जाऊन हा प्रकार घरी सांगताच
ग्रामस्थांनी त्याला उपचारांसाठी कसारा आराेग्य केंद्रात दाखल केले. त्याच्या
पाठीवर जखम झाली असून उपचार करून डाॅक्टरांनी त्याला घरी साेडले आहे. त्याची
प्रकृती स्थिर आहे. विकासकामांच्या नावाखाली होणारी बेसुमार जंगलतोडीमुळे वन्यजीवांचा
वाड्या, वस्तीत वावर वाढला आहे. कसारा, माळ, राड्याचापाडासह
समृद्धी महामार्ग जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक गावपाड्यांत बिबट्या, वानर, निलंगायी व
वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे.
कुत्रे, मांजर, बकऱ्या
केल्या फस्त -
बिबट्याचा वावर असलेल्या
तलावाजवळच्या खिंडीत बिबट्याने फस्त केलेल्या कुत्रे, कोंबड्या, बकऱ्यांचे
अवशेष सापडले आहेत. यावरून बिबट्याचा या खिंडीत वास्तव्य असल्याचा अंदाज स्थानिक
ग्रामस्थांनी वर्तवला आहे.
वनविभागाकडून पाहणी
वनविभागाचे अधिकारी चेतना शिंदे, वनकर्मचारी भोईर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याचा वावर असलेल्या
ठिकाणाची पाहणी केली. तसेच जखमी मंगेश मोरे याची विचारपूस करून त्याला मदतीचे
आश्वासन दिले. दरम्यान, वनविभागातर्फे
पिंजरे लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.