राज्य कायद्यानं नाहीतर बेकायद्यानं चाललं आहे. आपल्या डोक्यावर बेकायदेशीर सरकार बसवलं आहे. हे सरकार लवकरच जाणार असल्याचा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
सगळ्यात जास्त खोके बुलढाण्यात
शनिवारी
बुलढाण्यात शिवसेनेच्या वतीन शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या
मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय
राऊत यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. लवकरच राज्यातील सरकार जाणार असल्याचा
विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुलढाण्याच्या पवित्र भूमित गद्दारीची बीज रोवली
आहेत. ती आपल्याला कायमची उखडून फेकण्यासाठी या मशाली पेटल्या आहेत, असं म्हणत राऊतांनी शिंदे गटाच्या आमदारांचा समाचार घेतला.
बुलढाण्यात किती खोके आले? सगळ्यात
जास्त खोके बुलढाण्यात आले. एक फूल दोन हाफ. एक खासदार आणि दोन आमदार असे म्हणत
राऊतांनी शिंदे गटात गेलेल्या आमदार आणि खासदारांवर टीका केली.
एकही खोकेवाला परत निवडून जाता कामा नये
सगळ्यात
मोठी देवता या बुलढाणा जिल्ह्यात आहे ती म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ. रेणुका मातेचं
मंदीर इथे आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे. असे असताना 40 रेडे गुवाहाटीच्या देवीला नवस बोलायला गेले आहेत.
महाराष्ट्रातील देव संपले का? असा सवाल
राऊतांनी केला. हा महाराष्ट्र संताचा आहे. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बोलवून
घेतले आणि मुख्यमंत्री 40 रेड्यांचे
बळी द्यायला गुवाहाटीला गेल्याचे राऊत म्हणाले. एकही खोकेवाला परत निवडून जाता
कामा नये ही शपथ आपण घेतली पाहिजे असेही राऊत यावेळी म्हणाले. शिवसेनेसाठी आणि
उद्धव ठाकरेंसाठी 100 दिवस काय, जन्मठेप भोगायला मी तयार असल्याचे राऊत म्हणाले. ज्या
शिवसेनेने मला नाहीतर महाराष्ट्र आणि देशाला दिलं आहे. त्या शिवसेनेसाठी लाखो
शिवसैनिक जीवाची कुर्बानी द्यायला तयार आहेत. त्यासाठी एक संजय राऊत कुर्बान झाला
तर काय झालं. दाखवून देऊ आपण महाराष्ट्र आणि देशाला आमच्यावर कितीही अन्याय, अत्याचार करा पण लाखो शिवसैनिक तुम्हाला विकत घेता येणार नाहीत
असेही राऊत म्हणाले.