पोलिसांनी चक्क पत्रकारांनाच मागितली खंडणी? कारवाई होत नसल्याने सोमवारपासून उपोषण
पुरंदर : दि.२९
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील पोलीस दुरर्क्षेत्रातील पोलिसांनी पत्रकार भरत निगडे यांना चौकशीसाठी बोलून कथित प्रकरण मिटवण्यासाठी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास गुन्हे नोंद करू असा इशारा देत पत्रकार संघटनेच्या राहुल शिंदे व भरत निगडे यांना शिवीगाळ व मारहाण केली. एवढे होऊनही कथित प्रकरणाचा गुन्हा तब्बल दोन महिन्यांनी दाखल करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला. खंडणी वसूल करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी करूनही वरिष्ठांनी गुन्हे नोंद न केल्याने व्यथित होऊन शिंदे, निगडे व इतरजणांनी सोमवार ता.३१ पासून सासवड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार व पोलीस हे कायद्याचे रक्षक असून लोकशाहीचे स्तंभ आहेत. मात्र, पोलिसांच्या हातातील अतिरिक्त अधिकारांमुळे पत्रकारांची गळचेपी नित्याची झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरत निगडे यांनी नीरा शहरातील वाहतूक कोंडी बाबत काही महिन्यांपूर्वी बातमी दिली होती. या वेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी एका खाजगी व्यक्तीची बेकायदा नेमणूक केली होती. पोलिसांनी प्रत्यक्ष काम न करता, आपल्या कर्तव्यात कसूर करून तिऱ्हाईत व्यक्तीकडून वाहतूक नियंत्रित करण्याचा केली. त्यामुळे वाहतूक सुरळीत न होता प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. निगडे यांनी दिलेल्या बातमीनंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संबंधित तक्रारदाराने केली. याला पोलिसांनी खतपाणी घालून प्रकरण जातिवाचक बनविल्याचा आरोप निरेतील विविध संघटना करीत आहेत.
सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर यांनी तक्रार अर्जाची चौकशी करायची आहे, असे म्हणून निगडे यांना पोलीस चौकीत बोलून घेतले. त्यावेळी संदिप मोकाशी, निलेश जाधव यांनी निगडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी प तक्रारदार पोलीस दुरक्षेत्रात होते. प्रकरण मिटवायचे असेल तर एक लाख रुपये द्या. अशी मागणी पोलिसांनी केली. यानंतर निगडे यांनी आम्ही लिहलेली बातमी चुकीची नाही. ती बरोबर आहे, चुकीची असेल तर खुशाल गुन्हा दाखल करा असे म्हटले. यानंतर पोलिसांनी त्यांना शिवीगाळ व धक्का बुक्की केली. त्यानंतर राजेंद्र भापकर, हरिश्चंद्र करे यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली.
यानंतर निगडे जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद न घेता केवळ तक्रारी अर्ज दाखल करून घेतला. या उलट पोलिसांनी निगडे व शिंदे यांच्यावरच गुन्हे नोंद करीत कायद्याचा दुरुपयोग केल्याची चर्चा आता रंगत आहे.
यापूर्वी अनेक प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी तसेच घटनास्थळीचे घेतलेले साक्षीदार तेच ते आहेत. आपले म्हणणे कोर्टात सादर करण्यासाठी पैशाची मागणी करणे, पैसे न दिल्यास 'से' वेळेवर न देणे, अवैध धंद्यांची पाठराखण करणे या व अन्य अनेक प्रकरणात आता पोलिसांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
'नीरा आणि परिसरात पोलीस अनेक वेळा त्यांच्या कर्तव्यात कसूर करतात. परिसरातील अनेक बेकायदा कामांना पोलीस मुक संमती देतात. त्यामुळे नीरा परिसरात गुन्हेगारी वाढते आहे. पोलिसांच्या अनेक कृष्ण कृत्याची पोल खोल आम्ही केली आहे. त्यामुळे पोलीस आमच्यावर दबाव टाकण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. पत्रकार म्हणून आम्ही रोख ठोक लिखाण करू नये म्हणून दबाव टाकला जातो. त्यांचे वरिष्ठ अधिकारीही त्यांना पाठीशी घालतात. त्यामुळे न्यायासाठी आत उपोषण शिवाय पर्याय राहिला नाही."
भरत निगडे : पत्रकार