नीरा रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म शिवाय गाड्या थांबवल्याने प्रवाशांचे होतायेत हाल ;
पूर्वीप्रमाणे प्लॅटफॉर्मवरच एक्स्प्रेस थांबवण्याची मागणी
नीरा:
नीरा (ता.पुरंदर) रेल्वेस्थानकावर पुणे, मुंबई, नागपूर, गोंदियाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्या पूर्वीच्या प्लॅटफॉर्मवर न थांबता प्लॅटफॉर्म नसलेल्या तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांंचे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, नीरा रेल्वेस्थानकावर पूर्वीप्रमाणेच जुन्याच प्लॅटफॉर्मवरच गाड्या थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवाशांतून होत आहे.
नीरा स्थानकातून पुणे, मुंबई, अहमदनगर, नागपूरकडे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या दिवाळीमुळे प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. नीरा- पुणे लोहमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. २०) रात्री बारा पासून रेल्वे प्रशासनाने पुणे, मुंबईकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस (गाडी नं. ११०३०) तसेच गोंदिया, नागपूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस (गाडी नं. ११०२२) नीरा रेल्वे स्थानकांत तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना एक नंबरचा प्लॅटफॉर्मवर उतरून रेल्वेरूळ ओलांडून तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर उभ्या असलेल्या प्रवासी रेल्वेगाडीत बसण्याकरिता मोठी धावपळ करावी लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने नीरा रेल्वेस्थानकात पुणेच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्यांचा प्लॅटफॉर्म बदलल्याने लहान मुल, वृद्ध, आजारी प्रवाशांची मोठी धावपळ होत असून, त्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच स्थानकातील पादचारी पूल प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचा ठरत आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने पूर्वीप्रमाणे नीरा रेल्वे स्थानकातील जुन्या प्लॅटफॉर्म वर म्हणजेच नंबर एक वरच जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. नीरा ते पुणे यादरम्यान रेल्वेलाइनचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आल्याचे नीरा रेल्वे स्टेशन मास्टर महेश मीना यांनी सांगितले.
*******************************************
पुणे ते नीरापर्यंत लोहमार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने नीरा रेल्वेस्थानकातील तीन नंबरच्या रेल्वेलाइनवर पुणेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबवीत आहेत. रेल्वेगाडीकडे जाण्यासाठी प्रवाशांनी नीरा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावरून ये-जा करावी लागते.
मनोज झंवर (जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल, पुणे विभाग)
***********************************************
पुणे-मिरज रेल्वे लाईनचे दुपदरीकरण व विद्युती करताना सर्व स्थानकांत नव्याने प्लॅटफॉर्म बंधन्यात आले. अगदी वाल्हा, दौंडज, राजेवाडी, आंबळे याठिकाणी ही आता दोन उंच प्लॅटफॉर्म आहेत. पण सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या नीरा रेल्वे स्थानकात मात्र अद्याप दुसरा प्लॅटफॉर्मच नसल्याचे बहुदा पुणे विभागीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहितीच नसावे, त्यामुळे काल परवा पाहणी दौरा करुनही ही चुक त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे पुणे रेल्वे डिव्हिजनल कार्यालय हे नीरा रेल्वे स्थानकातील दुसऱ्या प्लॅटफॉर्म बाबत अनिभिज्ञच असावे, असा समज आता नीरेकरांनी करुन घेतला आहे.