बुवासाहेब ओढ्याच्या पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले.
सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प
नीरा :
सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील बुवासाहेब ओढ्याच्या तकलादू पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले आहे. काल मंगळवारी सायंकाळी नीरा परिसराला पावसाने अक्षरशा झोडपून काढले. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण कमी झाले, तरी संततधार सुरूच होती. त्यामुळे राख, गुळूंचे या परिसरातील ओढ्यांतून पाणी वाहून ते पाणी बुवासाहेब ओढ्याला आले. त्यामुळे रात्री बारानंतर या तकलादू पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक सकाळी साडे दहा
वाजेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे नीरा - बारामती व सातारा - नगर या मार्गावर वाहनांच्या रांगा तब्बल दोन किलोमीटर पर्यंत लागल्या आहेत.
गेली दीड वर्षापासून नीरा शहराच्या नजीक बारामती पुरंदरच्या शिवेवरील बुवासाहेब ओढ्याच्या पुलाचे काम संतगतीने सुरू आहे. हे काम सुरू असल्याने ठेकेदाराने ओढ्यातून फक्त तीन सांमेटच्या नळ्या टाकून तकलादु पुल तयार केला आहे. या तकलादू पुलावरून मागील महिन्यात सलग चार दिवस पाणी वाहिले होते. त्यावेळी या तकलादू पुलाचे नुकसान झाले होते. ठेकेदाराने पुन्हा फक्त मुरूम भरून तात्पुरती सोय केली होती. मात्र, मंगळवार रात्री झालेल्या पावसाने या पुलावरून पुन्हा पाणी वाहून गेले. त्यामुळे तो तकलादू पुल प्रवाहाच्या दोन्ही बाजूने खचला असून, भरावा एक ते दोन फुटाने वाहून गेला आहे. आता या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोकेदायक असल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुचाकी मात्र यावरून जात आहेत.
सध्या शाळा महाविद्यालयांच्या परिक्षेचा हंगाम आहे. नीरा व पुरंदरच्या खेडेगावातून बारामतीच्या पूर्व भागातील शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांची दररोज येत असतात. शाळेच्या बस व शिक्षक मोठ्या प्रमाणावर या पुलावरून दररोज ये - जा करत असतात मागील महिन्यात सलग चार दिवस व आज पुन्हा ऐन परीक्षेच्या तोंडावर हा पुल बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत शाळा प्रशासनाने मात्र कोणतीही कारणे चालणार नाही, शाळेत वेळेवर यावेच लागेल, असे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फर्मान काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तब्बल बारा किलोमीटरचा वळसा घालून गुळूंचे - थोपटेवाडी या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. हा मार्गही वाहतुकीसाठी धोकेदायक आहे.