वाल्हे परिसरात खरीप पिकांचे पंचनाम्यास सुरूवात.
वाल्हे (दि.२५) वाल्हे (ता.पुरंदर) व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने, पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
परिसरातील बाजरी, कांदा, तुर, भुईमूग, मका, सोयाबीन, सूर्यफूल आदी पिके हातची गेली असून, फळबागादेखील नुकसान झाले आहे. पावसामुळे बाजरी पिक तर गेले असुन कांदे ही नासले असुन, भुईमूगाच्या शेंगाना करे उगवायला लागले आहेत. यामुळे शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याधर्तीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार कृषी व महसूल विभागाने पिकांचे पंचनामे सुरू केल्याची माहिती गावकामगार तलाठी नीलेश अवसरमोल यांनी दिली.
मागील दोन - तीन वर्षांपासून खरीप - रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जात आहे.
या वर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीला पाऊसाने ओढ दिली होती. मात्र, खरीप हंगामात शेवटच्या टप्प्यात, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी साठून पिकांचे नुकसान आहे.
खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, कांदा, सोयाबीन, सूर्यफूल, मका आदी पिकांबरोबर ऊस व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा लागणीचा ऊस शेतामध्ये पाणी धरून राहिल्याने कुजून गेल्याने ऊस उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत सापडला आहे. तर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यादेखील मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या असून, मागील दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढग येत आहेत. खरीप हंगामातील काही पिके काढणीस आली असून, आता पुन्हा पाऊस आल्यास, यावर्षी खरीप हंगामा हाती लागेल की नाही या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत चिंताग्रस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महसूल आणि कृषी विभागांना अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी झाली नसल्याने पंचनाम्यांना उशीर झाला होता.
वाल्हे परिसरामध्ये कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यांना सुरुवात केली असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई - पीक पाहणी नोंदवून गावकामगार तलाठी व कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधून पिकांचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन महसूल व कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रसंगी गावकामगार तलाठी नीलेश अवसरमोल, कृषी सहायक मयुरी नेवसे, कृषी सहाय्यक गीता पवार, कोतवाल आनंद पवार यासह शेतकरीवर्ग हेमंत सूर्यवंशी, भरत महांगडे, शशिकांत पवार, अमोल महामुनकर, सुरेश पवार, गणेश महांगडे आदी शेतकरीवर्ग उपस्थित होते.