नीरा येथे निर्माल्य दान उपक्रमाला गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद
पाण्यात जाणारे तीन टन निर्माल्य करण्यात आले जमा
नीरा : १०
नीरा (ता.पुरंदर) येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी गणेश विसर्जन ना च्या वेळी राबवलेल्या निर्माल्य दान उपक्रमाला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यावेळी सुमारे तीन टन निर्माल्य जमा करण्यात आले. हे सर्व निर्माल्य नदी पात्रात टाकल्याने होणारे नदी प्रदूषण यामुळे टाळले आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे लोकांकडून कौतुक होत आहे.
नीरा येथील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शेकडो श्रीसेवकांनी स्वयंस्फुर्तीनी या अभियानात सहभाग घेतला. सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे निर्माल्य जमा करण्यात आले.सुरवातीला निर्माल्य कलशामध्ये व नंतर तीन ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये जमा केले. गणपती मुर्ती विसर्जन करते वेळी फुलांचे हार, दुर्वा, पाने, नारळ, फळे, प्रसाद आदी साहित्य नदीपात्रात टाकले जाते. त्यामुळे नदीतील पाणी दुषित होते, ते टाळण्याच्या दृष्टीने गणपती विसर्जनाला आलेल्या भाविकांना या सदस्यांनी निर्माल्य नदीत न टाकता आमच्याकडे जमा करण्याचे आवाहन केले, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निर्माल्य गोळा करून त्याचे खत करण्यात येणार असुन पुढील काळात ते खत वृक्षांना टाकण्यात येणार आहे.
नीरा नदीच्या दत्तघाटावर नीरा, लोणंद परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हजारो भाविक येतात. सुमारे अडीच हजार गणेश मुर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या आव्हानाला परिसरातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला.