पुरंदर मध्ये आढळली २८ जनावरे लंपी बाधित
पुरंदर दि.२१
पुरंदर तालुक्यामध्ये सासवड येथील इनामके मळ्यात लम्पीचे पहिले जनावर मागील काही दिवसांपूर्वी आढळले होते. त्यानंतर प्रशासनाने त्वरित इनामके मळ्यापासून पाच किलोमीटर कार्यक्षेत्रामध्ये लसीकरणात सुरुवात केली होती.
त्यानंतर पुरंदर तालुक्यांमध्ये एकूण २८ जनावरे लम्पी आजाराचे ग्रस्त आहेत. यातील ५ जनावरे बरी झाली असून, तालुक्यामध्ये आजअखेर १० हजार जनावरांचे लसीकरण पशुवैद्यकीय विभागामार्फत पूर्ण झाले आहे. इनामके मळा, पांगारे, भिवरी या तीन एलएसडी ईपीसेंटरमध्ये ८ हजार ५३७ जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून, प्रशासनाकडून पुरंदर तालुक्यासाठी आत्तापर्यंत ९ हजार लसींचा पुरवठा करण्यात आला होता.
परंतु, तालुक्यातील विविध ठिकाणी लम्पीग्रस्त जनावरे आढळत असल्याने प्रशासनाकडे अजून लशींची मागणी केली आहे. तालुक्यातील सासवडनजीक असलेल्या इनामके मळ्याच्या पाच किलोमीटर क्षेत्रामध्ये ६ हजार १७ गाईवर्गीय जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. तर, भिवरीमध्ये १ हजार २०० व पांगारे येथे १ हजार २०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रशासनाकडे पुरंदर तालुक्यातील भिवरी, पांगारे, जवळार्जुन, माळशिरस त्यासोबतच पुढे उद्भभणार्या गावांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी १२ हजार लशींची मागणी प्रशासनाकडे केली होती
दरम्यान पुरंदर तालुक्यासाठी प्रशासनाच्या वतीने १२ लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.याबाबतची माहिती गुळूंचे येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी भंडलकर यांनी दिली आहे त्यामुळे आता पशुवैद्यकीय विभागाकडून लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे.तर काही भागात पशुपालकांनी या पूर्वीच खाजगी पशुवैद्याकडून लंपीचे लसीकरण करून घेतले आहे.
दरम्यान गायीवर्गीय जनावरांच्या दुधापासून मानवामध्ये हा विषाणू प्रवेश करीत नाही. त्यामुळे गाईच्या दुधापासून मानवाला कुठलाही धोका नाही. पशुवैद्यकीय तज्ञ व अभ्यासक सांगत आहेत.