घरेच नाहीत...नोटीस बजवायची कुठे ?
गुळुंचे तलाठी कारवाई प्रकरणात ग्रामस्थांचा प्रशासनावर हल्लाबोल
नीरा दि.१९
"ज्यांची मतदार यादीतून नावे कमी करण्याबाबत आक्षेप घेतले होते त्यात अनेकजणांची घरेच गावात नाहीत. मग तलाठ्यांनी नोटीस कुठल्या घरावर बजवायची होती ?" असा संतप्त सवाल करत प्रशासनावर हल्लाबोल केला. नितीन निगडे, अक्षय निगडे यांनी तसे निवेदन आज पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत व मतदान अधिकारी उत्तम बडे यांना दिले.
गावकामगार तलाठी महाजन यांच्यावर झालेली कारवाई ही राजकीय दबावनाट्य असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. वास्तविक मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रियेत बीएलओ काम पाहतात. मग, सगळ्या गावांच्या मतदारांच्या पंचनाम्याची जबाबदारी तालाठ्यांवर टाकणे कायद्याच्या विसंगत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दुबार व बोगस मतदार कमी करण्याच्या नोटिसा बजावल्या गेल्या नव्हत्या तर मग तहसील कार्यालयात मतदार उपस्थित कसे राहिले ? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकीकडे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मतदार यादीचे शुद्धीकरण करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी करून नावे समाविष्ट करण्याचे आदेश दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींत्व कायदा १९५० च्या कलम 32 प्रमाणे दोन ठिकाणी मतदान यादीत नावे असणाऱ्या मतदारांवर गुन्हे नोंद करण्याची मागणी नितीन निगडे व इतरांनी आज केली. नेमक्या किती जणांना नोटिसा मिळाल्या नाहीत किंवा किती जणांच्या पंचनाम्यावर स्वाक्षरी मिळाली नाही याबाबत निकालात काहीही स्पष्टता नसल्याने सगळीच प्रक्रिया सदोष कशी असू शकेल असाही प्रश्न आता ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे. दरम्यान, कमी केलेल्या मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करू नयेत अन्यथा न्यायालयात दाद मागू असा इशारा निगडे यांनी दिला आहे.
"बेकायदा पद्धतीने राजकीय दबावाने तलाठी महाजन यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. केवळ मतदानापूरते लोक आणले जातात याचा फायदा एका गटाला होत आहे. शिक्षणसंस्थेतील अनेक बदली होऊन गेलेल्या शिक्षकांची नावे देखील कमी नाहीत. लोकशाहीची ही शोकांतिका आहे." - नितीन निगडे, अर्जदार, गुळुंचे.