शिवसेनेचे ठाण्याचे नवे जिल्हाप्रमुख केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघेंविरोधात बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
केदार दिघे हे दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच त्यांची ठाण्याच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली होती.
मुंबईतल्या एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा बलात्कार आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघेंसह त्यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधातही पीडित महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. तसेच केदार दिघे यांनी पोलिसांत तक्रार देऊ नये म्हणून धमकावल्याचाही पीडित महिलेने आरोप केला असून, त्यांच्या विरोधात आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार २३ वर्षीय महिला ही एका खासगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर आहे. ती पीडित महिला मुंबईतल्या लोअर परेल येथील सेनापती बापट मार्गावरील रेजिस हॉटेलमध्ये येणाऱ्या गेस्टला क्लब मेंम्बरशिपबाबत माहिती देण्याचे काम करते. २८ जुलै २०२२ रोजी २३ वर्षीय पीडित महिलेस आरोपी रोहित कपूर याने क्लब गॅरेट मेम्बरशीप घेतो, असे सांगून सेंट रेजिस हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले आणि जेवण झाल्यानंतर मेम्बरशीपच्या बहाण्याने तो थांबलेल्या रुममध्ये घेऊन गेला. सदर महिला त्या रूममध्ये गेली असता तिच्यावर आरोपी रोहित कपूर याने लैंगिक अत्याचार केला.
सदर महिलेने घाबरून कोठेही वाच्यता केली नाही. परंतु ३१ जुलै २०२२ रोजी पीडित महिलेने सदरची घटना तिच्या मित्रांना सांगितली आणि आरोपी रोहित कपूर यास व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करून त्यास जाब विचारला असता त्याने तिचे व्हॉट्सअप ब्लॉक केले. त्यानंतर ०१ ऑगस्ट २०२२ ला तक्रारदार महिलेने तिच्या मित्राच्या मदतीने आरोपीस विचारणा केली असता त्याने प्रतिसाद दिला नाही आणि आरोपी रोहित कपूर याने त्याचा मित्र असलेला आरोपी केदार दिघे याच्या मध्यस्थीने सदर पीडित महिलेस पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणाकडेही वाच्यता न करण्याबाबत सांगितले. परंतु त्यास तक्रारदार महिलेनं नकार दिला असता आरोपी केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारदार महिलेच्या जबाबावरून ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात आरोपी रोहित कपूर आणि केदार दिघे यांच्या विरुद्ध कलम ३७६, ५०६ (२) भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत
आहेत.