पुण्यातील व्यापाऱ्याची वीर धरणाच्या पाण्यात आत्महत्या
वीर दि.३०
खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीमध्ये वीर धरण परिसरातील नीरा नदीच्या पात्रामध्ये पुणे येथील व्यापारी सुरज हणमंत सुंदर (वय ४२,रा.पुणे) असे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान सुरज सुंदर यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज शिरवळ पोलीसांनी वर्तविला आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पुणे येथील जमीन व्यवहार व लाइजनिंगचा व्यवसाय करणारे सुरज सुंदर हे बुधवार दि.२७ जुलै रोजी पुणे येथील घरामधून पैश्यांचे काम आहे असे सांगत घरातून कार (क्रं.एमएच-०२-डिजे-४७६१) घेऊन बाहेर आले होते. यावेळी सुरज सुंदर यांनी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान व्हिडिओ दूरध्वनीद्वारे पत्नी ज्योती सुंदर यांना आला असता त्यांनी मी हरलो आहे व सिधुला मुलगा आर्यनवर लक्ष ठेवण्यास सांग मी माझे जीवन संपवणार आहे असे सांगितले.दरम्यान,गुरुवार दि.२८ जुलै रोजी सुरज सुंदर यांनी आणलेली कार तोंडल ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये शिरवळ - लोणंद रस्त्यावरील नीरा नदीच्या पात्रा लगत असणाऱ्या एका हॉटेलजवळ शिरवळ पोलिसांना बेवारस स्थितीमध्ये आढळून आली होती. यावेळी शिरवळ पोलीसांनी माहिती घेत पत्नी ज्योती सुंदर यांना याबाबतची कल्पना देत वीर धारण परिसरामध्ये असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रात शोध मोहीम राबविली. यावेळी शुक्रवार दि.२९ जुलै रोजी सुरज सुंदर यांचा मृतदेह नीरा नदीच्या पात्रामध्ये स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने मिळून आला.यावेळी घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ,सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे,पोलीस अंमलदार सुनील मोहरे यांनी भेट देऊन पाहणी केली.
या घटनेची फिर्याद सिदार्थ कांबळे याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार सुनील मोहरे हे करीत आहे.