सावधान !! बिगरशेती प्लॉट घेताय ? खात्री करा तुमची फसवणूक होऊ शकते
बिगर शेती अर्थात एन ए चा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणूक ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल.
सासवड दि.२८
पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयात बिगर शेतीचा खोटा आदेश देऊन शासनाची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सासवड पोलिसात नायब तहसीदार यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 468,420 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आरोपी अल्तापहुसेन बाबासाहेब पाटील याने मार्च 2022 मध्ये हिवरे येथील गट नं.829,830,831,832,833 या शेतजमीन गटाचे फाळणीबारा नुसार प्लॉटच्या नोंदी करता येतील का असे तेथील तलाठी यांना विचारले.यासाठी तलाठी निलम देशमुख यांना त्यांचेकडे असलेली एन.ए. ऑर्डर ही दाखविली. तलाठी यांनी सदर ऑर्डरनुसार नोंद करता येत नाही. तुम्ही कजाप करुन आणा, त्याशिवाय नोंदी धरता येणार नाहीत. असे सांगितले. त्यानंतर मा.उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर उपविभाग पुरंदर यांनी तलाठी यांना या गटाचा पंचानामा करुन मागितला. त्याप्रमाणे तलाठी यांनी पंचनामा सादर केला. यानंतर उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर यांच्या आदेश नुसार हिवरे येथील जमीनगट नं.829 व इतर बाबत पारित केलेल्या बिनषेती आदेशाची एस आर रजिस्टरची साक्षांकित प्रत सादर करण्यास सांगितले. त्या पत्राचे अनुशंगाने अभिलेख कक्षामध्ये शोध घेतला. त्यावेळी हिवरे येथील ही केस आढळुन आली नाही. तसेच त्यावेळेच्या अकृशीक नोंदवहीमध्ये सुद्धा सदर आदेषाची नोंद आढळुन आली नाही. त्यानंतर अकृषिक नोंदवही रजिस्टरची सत्यप्रती सह कार्यालयाकडील अहवाल उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आला. यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणी फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्याचे आदेश दिली यानंतर निवासी नायब तहसिलदार दत्तात्रय भिकाजी गवारी, यांनी फसवणूक प्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस करीत आहेत.