Type Here to Get Search Results !

दोन लेकरांच्या आई असलेल्या बाबलिने तरुणाला घातला लाखोंचा गंडा

 दोन लेकरांच्या आई असलेल्या बाबलिने तरुणाला घातला लाखोंचा गंडा



 जालना दि.८



              विवाह इच्छुक तरुणाकडून २ लाख रुपये घेऊन विवाह केला. लग्नानंतर दहा दिवस गोडीगुलाबीने संसारही केला आणि रफुचक्कर होण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन लेकरांच्या विवाहितेचा जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पैशांसाठी लग्न करणारी ही बबली अखेर गजाआड झाली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फसवेगिरी करणारी ही नवरी दोन मुलांची आई असल्याचं निष्पन्न झाल्याने पोलिसही चक्रावले आहेत.



जालना जिल्ह्यातील भोकरदन इथे २५ वर्षीय रावसाहेब भाऊसाहेब सहाणे हा तरुण नेवासा येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. या तरुणाच्या विवाहासाठी नातेवाईकांनी रमेश शेळके याच्या मध्यस्थीने एक मुलगी पहिली. सोनी वानखेडे नावाची मुलगी असून ती आश्रमात राहते, पण लग्न करायचे असल्यास तिला २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने रावसाहेबचे नातेवाईक रमेशच्या थापेला भुलले आणि लग्नासाठी तयार झाले. ठरल्याप्रमाणे २४ जून रोजी वाडी येथील गणपती मंदिरात रावसाहेबचा विवाह सोनी वानखेडे हिच्यासोबत लावून देण्यात आला. विशेष म्हणजे लग्नाला मुलीच्या आईसह काही नातेवाईकांचीही उपस्थिती होती.


         लग्न सोहळा पार पडल्यानंतर ठरल्याप्रमाणे वरपक्षाकडून २ लाख रुपये देण्यात आले व व्यवहार पुरा झाला. त्यानंतर नवरदेव रावसाहेब नववधू सोनी हे नवं दाम्पत्य सोयगाव देवी इथे जाऊन आले व रावसाहेबचा संसार सुरू झाला. लग्नानंतर सोनी एकदा माहेरी जाऊन आली. परत आल्यानंतर तिने रावसाहेबला मी पुन्हा एकटीच माहेरी जाऊन येते असं म्हणाली. यासाठी ६ जुलै रोजी भोकरदन बस स्टँडवर रावसाहेब सोनीला सोडण्यासाठी आला. बसस्थानकावर एका व्यक्तीला पाहून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. सदर व्यक्ती आणि सोनीच्या वागण्यावरून हा सोनीचा प्रियकर असल्याचं रावसाहेबच्या लक्षात आले.



आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रावसाहेबने तडक पोलीस ठाणे गाठत आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिल्याने भोकरदन पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवीत नववधूला ताब्यात घेतले. तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, सहायक पोलीस निरीक्षक राजाराम तडवी यांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच सोनीने विवाह इच्छूक युवकाकडून पैसे घेऊन लग्न करत फसवणूक केल्याची कबुली दिली आहे.


रावसाहेब सहाणे यांच्या तक्रारीवरून नववधू सोनी वानखेडेसह इतर नऊ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नववधू सोनी वानखेडे हिला पोलिसांनी अटक केली आहे. सोनीचे लग्नातील नातेवाईक देखील बनावट असल्याचे समोर आले असून सोनी वानखेडे ही विवाहित असून तिला दोन मुली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेले असून या बबलीने अजून किती जणांना गंडा घातला याचा तपास सुरू आहे.



'

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies