एसटीच्या शटल सेवेचं ग्रामीण भागातील वाल्हे,पिसूर्टी येथे उत्स्फूर्त स्वागत
वाल्हे दि.८
तालुक्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या एसटीच्या शटल सेवेचे वाल्हा आणि पिसूर्टी या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले आहे. चालक व वाहक यांचा सत्कार करून लोकांनी पुन्हा एकदा आपला एस टी बद्दल असलेला जिव्हाळा व्यक्त केला आहे.
पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एसटीने आता नव्याने शटल सेवा सुरू केली आहे. निरा ते स्वारगेट अशी दर एक तासाला ही शटल धावणार आहे. तालुक्यात ग्रामीण भागात पीएमपीएलने बस सेवा सुरू केल्यानंतर एसटी महामंडळाने आक्षेप घेतला होता. सासवड आगारातून आता पीएमपीएल प्रमाणेच निरा - स्वारगेट व स्वारगेट - निरा अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसचे स्वागत पुरंदर तालुक्यातील वाल्हे आणि पिसुर्टी या गावां मध्ये करण्यात आले.
ही एसटी बस वाल्हे येथील बस थांब्यावर आल्या नंतर, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले यांच्या हास्ते, वाहतूक नियंत्रण गायकवाड, वाहक गणेश भुजबळ व चालक फाळके यांचा शाल, नारळ, हार, देऊन व पेढे भरवून स्वागत करण्यात आले.
त्याच बरोबर पिसुर्टी ग्रामपंचायतच्या वतीने, निरा स्वारगेट शटल बस सेवा सुरू केल्याबद्दल, चालक, वाहक यांचा सत्कार सरपंच सारिका चोरमले, उपसंरपंच सुखदेव बरकडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी, माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, सुर्यकांत भुजबळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, हनुमंत पवार, शिवसेना तालुका उपप्रमुख सागर भुजबळ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश पवार, सरचिटणीस दादासाहेब मदने,भास्कर भुजबळ, भाजपचे शहराध्यक्ष चंद्रकांत सासवडे, निलेश पवार, डॉ.रोहिदास पवार, दीपक कुमठेकर, उद्योजक विनोद पवार, कुमार चव्हाण , लालासो पवार,संभाजी पवार, विनोद शहा आदी मान्यवर उपस्थित होते.