Type Here to Get Search Results !

करिअर प्लॅनिंग आणि कौशल्य विकास

 

करिअर प्लॅनिंग आणि कौशल्य विकास



करियर निवड करणे म्हणजे काय? याचा विचार करताना अनेक समज गैरसमज पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात. एखाद्या विषयात चांगले गुण मिळतात म्हणजे त्या विषयाशी निगडित क्षेत्रात उत्तम करिअर होईल ,असा गैरसमज असू शकतो. करियर विषयी फक्त अंदाजे  निर्णय घेणे भविष्यात समस्या निर्माण करू शकते .                                               

             स्वतः जवळील गुणांचा किंवा क्षमतांचा अभ्यास करून ,त्यांचा विकास करून आपल्या आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करून समाधान मिळवणे आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे याला करिअर म्हणतात.करिअर म्हणजे काय हे एकदा निश्चित समजले की ,करिअर प्लॅनिंग चे महत्व लक्षात येते. करिअर प्लॅनिंग कसे आणि कधी करावे याही बद्दल विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात प्रश्न असतात.सर्वसाधारणपणे इयत्ता दहावी नंतरचे करिअर प्लॅनिंग ची सुरुवात करणे योग्य ठरते. दहावीपर्यंत विद्यार्थी शालेय जीवनात अत्यंत सुरक्षित वातावरणात असतात मात्र त्यानंतरच अभ्यास,नोकरी, व्यवसाय अशी नवी आव्हाने सुरू होतात. योग्य करिअर प्लॅनिंग असेल तर ही आव्हानेही यशस्वीरित्या पेलता येतात.                                                        

                दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वाणिज्य, विज्ञान किंवा कला या मूलभूत शाखा निवडण्यापूर्वी करिअर प्लॅनिंग महत्त्वाचे ठरते. वाणिज्य, विज्ञान किंवा कला शाखा हा पर्याय निवडत असताना कोणते विषय निवडावे लागतील, पुढील प्रवेश परीक्षा कोणत्या याविषयीची माहिती घेणे हा करिअर प्लॅनिंग मधील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ही माहिती तज्ञ मार्गदर्शक आणि शिक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन मिळवता येते.फक्त माहितीच्या आधारे करिअर प्लॅनिंग करू नये. विविध शाखांची माहिती घेतल्यानंतर स्वतःचे मूल्यांकन करणे आवश्यक ठरते.म्हणजे स्वतःचे सामर्थ्य ओळखणे. सकारात्मक गोष्टी कोणत्या आणि त्यांचा उपयोग करियरसाठी कसा होऊ शकेल याचे मूल्यमापन करणे.                                  गणितीय बुद्धिमत्ता,भाषिक बुद्धिमत्ता,संवाद कौशल्ये या गोष्टी प्रत्येकाकडे कमी-जास्त प्रमाणात असू शकतात. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वास काय अनुकूल आहे हे समजून घेणे करिअर प्लानिंग साठी आवश्यक ठरते.कोणत्याही करिअरचे नियोजन करत असताना शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा तसेच भविष्यातील नोकरी व व्यवसायाच्या संधी यांचाही सारासार विचार करणे आवश्यक ठरते.                                      

              आजकालच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरवले आणि प्रवेश घेऊन शिक्षण घेतले इतकेच यशस्वी होण्यासाठी पुरेसे नाही.

 बहुराष्ट्रीय कंपन्या, बँका, सेवा क्षेत्रातील कंपन्या आजकाल नोकरीसाठी बहुआयामी कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देतात. बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये याविषयी जागृती केली जाते.म्हणजेच चांगल्या शिक्षणासोबतच पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत नवनवीन कौशल्य शिकण्याचे नियोजन ही करावे लागते.यामध्ये इंग्रजी आणि परकीय भाषा कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स, आयटी संबंधित कौशल्ये वाढवणे महत्त्वाचे ठरते.                                              

                करिअर प्लॅनिंग करत असताना प्रत्येकाने नोकरी करणे हाच पर्याय स्वीकारावा असे नाही. एखादा नवीन व्यवसाय सुरू करून काही वर्षात तो वाढवत नेऊनही उत्तम करिअर करता येते. त्यासाठी पदवी शिक्षणासोबतच व्यवसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.  पदवी आणि त्यानंतरचे शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय या विषयीचे जे प्लॅनिंग आधी केलेले असते त्यामध्ये काही कारणांमुळे किंवा बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याची वेळ येऊ शकते.त्यामुळे करिअर प्लॅनिंग करत असताना बॅकअप प्लॅन तयार ठेवणेही आवश्यक ठरते. म्हणजेच आवश्यकता पडल्यास बॅकअप प्लॅननुसार करिअर करता येऊ शकते.

                    नोकरी आणि व्यवसायामध्ये सतत वाढत असलेल्या तीव्र स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी उत्तम करिअर निवडणे आणि त्यामध्ये पुढे जात राहणे ही अतिशय आव्हानात्मक गोष्ट पालक आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ठरत आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies